मौदा (तालुका प्रतिनिधी)
जवाहर नवोदय विद्यालयात (JNV) सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी आयोजित निवड परीक्षेचा (JNVST) पहिला टप्पा शनिवार दि. १३ डिसेंबर रोजी मौदा तालुक्यात पूर्ण शांततेत आणि सुरळीतपणे पार पडला.तालुक्यात एकूण १३५९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी १२९० विद्यार्थी परीक्षेला हजर झाले. प्रशासनाने परीक्षेसाठी तीन केंद्रे निश्चित केली होती. प्रत्येक केंद्रावर पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख आणि पोलीस कर्मचाऱ्यांची काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांची ओळखपत्रे तपासणे, हॉलमध्ये शांतता राखणे आणि कॉपीप्रकरणापासून मुक्त वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
परीक्षा केंद्रांची पाहणी केल्यानंतर गटशिक्षणाधिकारी संकेत मरसकोल्हे यांनी व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “नवोदय प्रवेश परीक्षेचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक केले होते. सकाळपासून विद्यार्थी आणि पालक केंद्रांवर उपस्थित होते. कोणत्याही केंद्रावर गोंधळ किंवा अनुचित घटना घडली नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता ही महत्त्वाची परीक्षा यशस्वीपणे पार पाडणे हे प्रशासनाचे कर्तव्य होते आणि ते आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण केले. सर्व केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!” केले आहे. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी उत्साहाने केंद्राबाहेर पडले.
परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी उत्साहाने केंद्रातून बाहेर पडले. आता या परीक्षेचा निकाल नवोदय विद्यालय समितीच्या (NVS) अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येईल.




