गिरीश आंदे
ओम साई पब्लिक स्कूल सावनेर तर्फे आज दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वार्षिक समारंभाचे आयोजन कै. राम गणेश गडकरी सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांची प्रमुख अतिथी म्हणून विशेष उपस्थिती लाभली होती.
समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळेतील लहान मुला-मुलींनी आपल्या आजी-आजोबांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली. समाजात ज्येष्ठांचा मान राखावा व त्यांच्याकडून आदर्श घ्यावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य, गीत, नाटिका तसेच समूह सादरीकरणांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस अभिनयातून आणि आकर्षक सादरीकरणातून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमादरम्यान सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. पालक व उपस्थित नागरिकांनी कार्यक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
एकंदरीत, वार्षिक समारंभ उत्साहात पार पडला असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात शाळेला यश आले आहे.




