(तालुका प्रतिनिधी हिंगणा)
वानाडोंगरी (संगम) नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, महिला नेतृत्वाचा नवा चेहरा म्हणून मंदाकिनी रूपराव खंगार (डी.एड.) यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. समाजकारण, शिक्षण आणि प्रामाणिक कार्यशैली यामुळे त्यांच्याकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे.
सेवानिवृत्त शिक्षिका आणि प्रगत ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या महिला उपाध्यक्षा असलेल्या मंदाकिनी खंगार यांनी आपले आयुष्य शिक्षण सेवेला वाहिले आहे. त्यांनी जिल्हा परिषद नागपूरच्या हिंगणा व कुही ब्लॉक वेलतूर येथे १८ महिन्यांची सेवा बजावली असून, जनगणना अधिकारी, मतदान अधिकारी, आधार कार्ड व मतदान कार्ड अद्ययावतकरण, बोर्ड पेपर तपासणी यांसारखी जबाबदारी पार पाडली आहे. यानंतर त्यांनी लोक शिक्षण संस्था (लोकांची शाळा), रेशीमबाग येथे तब्बल ३० वर्षे सहाय्यक शिक्षिका म्हणून सेवा केली, तसेच शेवटची ६ वर्षे सोमलवार हायस्कूल नागपूर येथे कार्य करून निवृत्त झाल्या.
त्यांच्या प्रामाणिक कार्यपद्धतीने आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे त्या समाजात आदरस्थान प्राप्त करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. सध्या त्या “हितगुज” मासिकाच्या सहसंपादक (फेसकाम, पूर्व विदर्भ प्रादेशिक विभाग, नागपूर) म्हणून कार्यरत आहेत.
प्रगत ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष विनोद चंदनखेडे, उपाध्यक्ष दिगंबर खुसपरे, माजी सरपंच मधुकर काथोटे, मधुकर घोडमारे, गुलाबराव मानकर, देवराव पवार, श्याम वाकोडे, तिलक मेश्राम, नरेंद्र पटले, नरेश नवले, शाहरुख शेख, इंदुबाई मदनकर, पुष्पाताई आवारी, पुष्पाताई डाखळे आदी पदाधिकाऱ्यांनी श्रीमती खंगार यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी लढविण्याचे आवाहन करत अधिकृत पाठिंबा दर्शविला आहे.
मंडळाच्या प्रतिनिधी मंडळाने आमदार समीर मेघे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जवळपास तीनशे ज्येष्ठ नागरिकांचे सह्याचे समर्थनपत्र सादर करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे वानाडोंगरीच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी एका अधिवेशनात म्हटले होते — “ज्येष्ठ नागरिक मंडळातील पदाधिकाऱ्यांना प्रतिनिधित्व मिळायला हवे,” आणि आता त्याच विधानाचा प्रत्यय येत असल्याचे दिसत आहे.
वानाडोंगरीत मंदाकिनीताईंच्या नावाने एक वेगळीच चर्चा रंगली आहे. नागरिकांमध्ये उत्सुकता, महिलांमध्ये आत्मविश्वास, आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांची उमेदवारी वानाडोंगरीच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिणारी ठरेल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
वानाडोंगरीत महिला नेतृत्वाची नवी दिशा — मंदाकिनी खंगार यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे !
Home Breaking News वानाडोंगरी नगराध्यक्ष पदासाठी मंदाकिनी रूपराव खंगार यांच्या नावाची जोरदार चर्चा — ज्येष्ठ...




