Home समस्या नेवली तलाव झाला ‘लाकूड डेपो’-लाखोंचा साठा,वन व जलसंपदा विभाग गप्प

नेवली तलाव झाला ‘लाकूड डेपो’-लाखोंचा साठा,वन व जलसंपदा विभाग गप्प

83
0

गिरीश आंदे
कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी गावाजवळील नेवली तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर लाकूड साठवणूक करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या तलावाच्या काठावर लाखो रुपयांचे लाकूड खुलेआम रचून ठेवण्यात आले आहे. मात्र या प्रकाराकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
मागील काही दिवसांपासून तलाव परिसरात रात्रीच्या सुमारास वाहनांची ये-जा वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानंतर तलावालगतच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर लाकूड साठवलेले दिसून आले.या लाकडाची किंमत लाखोंमध्ये असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
विशेष म्हणजे,एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठवणूक होत असताना वन विभाग, जलसंपदा विभाग यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाव हा जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येत असताना त्याठिकाणी होत असलेल्या या साठवणुकीबाबत कोणतीही ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तलाव परिसराचा वापर लाकूड डेपोप्रमाणे केला जात असल्याने पर्यावरण व जलस्रोत धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी तातडीने पंचनामा करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान,नेवली तलावावरील हा ‘लाकूड डेपो’ प्रकार नेमका कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे, आणि प्रशासन कधी जागे होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here