गिरीश आंदे
कळमेश्वर–ब्राह्मणी नगरपरिषदेतील विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक नगरपरिषदेच्या सभागृहात दि. 29 जानेवारी रोजी पार पडली. यावेळी नगरपरिषदेतील प्रमुख पाच विषय समित्यांची स्थापना करून त्यांच्या सभापतींची एकमताने निवड करण्यात आली.
स्थापन करण्यात आलेल्या समित्यांमध्ये शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापतीपदी प्रगती मंडल, पाणीपुरवठा व जलनिसारण समितीच्या सभापतीपदी सुनील चूनारकर, तर सार्वजनिक बांधकाम तसेच नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष व भाजप गटनेते धनराज देवके यांची निवड करण्यात आली.
याचप्रमाणे स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी मनोज शेंडे, तर महिला व बालकल्याण तसेच सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी वर्षा कामडी यांची एकमताने निवड झाली.
कळमेश्वर–ब्राह्मणी नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह 15 नगरसेवक भाजपाचे, तर 6 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले होते. सद्यस्थितीत झालेल्या विषय समित्यांच्या निवडीत पाचही सभापतीपदांवर भाजप नगरसेवकांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार नगराध्यक्षांकडे असून, विषय समित्यांचे सभापती सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त स्थायी समितीवर सदस्य म्हणून नगरसेवक आशिष कुकडे यांचीही निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून वानाडोंगरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल परिहार यांनी कामकाज पाहिले. यावेळी पालिका मुख्याधिकारी आकाश सुरडकर, नगराध्यक्ष अविनाश माकोडे, तसेच भाजप व काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
Home राजकीय कळमेश्वर–ब्राह्मणी नगरपरिषदेत विषय समित्यांच्या सभापतींची एकमताने निवड; पाचही पदांवर भाजपचे वर्चस्व




