Home समस्या महावितरण व पॉलीकॅबची मनमानी सुरूच ! सार्वजनिक बांधकाम विभाग कधी करणार कारवाई...

महावितरण व पॉलीकॅबची मनमानी सुरूच ! सार्वजनिक बांधकाम विभाग कधी करणार कारवाई ?

93
0

गिरीश आंदे
सावनेर–तिष्टी मार्गे काटोल रोडवरील सावंगी व तेलकामठी परिसरात महावितरणकडून नवीन वीजवाहिनी उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर झाडतोड करण्यात आली आहे. मात्र, रस्त्यावर आणि दुतर्फा पसरलेल्या फांद्यांमुळे वाहतुकीसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनचालकांमध्ये भीती वाढली असून, खास करून धुक्यात रात्री व पहाटे अपघात घडण्याची शक्यता अधिक आहे.
वनविभागाने आपली जबाबदारी पळवाटेने टाळण्याचा प्रयत्न केला आहे. कळमेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण शिरपूरकर म्हणाले, “वीजवाहिनीखालील फांद्या तोडण्याचे अधिकार महावितरणकडे आहेत. वनविभाग झाडे तोडत नाही.” मात्र स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की सार्वजनिक सुरक्षितता राखणे हे वनविभागाचे कायदेशीर कर्तव्य आहे.
महावितरण व पॉलीकॅबचे अधिकारी म्हणतात की त्यांना परवानगी घेण्याची गरज नाही. मात्र, प्रत्यक्ष रस्त्यावर फांद्या अजूनही पसरलेल्या आहेत, ज्यामुळे वाहतुकीला गंभीर अडथळा निर्माण होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कळमेश्वर उपविभागीय अभियंता सुहास ओचावर यांनी स्पष्ट केले, “महावितरण व पॉलीकॅबने आमच्या हद्दीत कोणतीही परवानगी न घेता काम केले आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार परवानगीशिवाय काम केल्यास पोलिसांत तक्रार दाखल केली जाईल.”
स्थानीय नागरिकांचा संताप वाढत असून, त्यांनी तातडीने रस्त्यावरील फांद्या हटवणे, वाहतुकीसाठी योग्य उपाययोजना करणे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तरीही, दिनांक 21 जानेवारी 2026 पासून दहा दिवसांनंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस कारवाई केली नाही, तर महावितरण व पॉलीकॅबची मनमानी सुरूच आहे. नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत – “सार्वजनिक बांधकाम विभाग कधी करणार कारवाई?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here