Home कृषी पांदण रस्ता की चिखलाची वाट ? भागी माहिरी–खापा मार्गावर शेतकऱ्यांची फरफट

पांदण रस्ता की चिखलाची वाट ? भागी माहिरी–खापा मार्गावर शेतकऱ्यांची फरफट

49
0

अशोक काळबांडे
सावनेर तालुक्यातील भागी माहिरी ते खापा पांदण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यामुळे परिसरातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल व पाणी साचत असल्याने शेतात जाणेही कठीण झाले आहे. पक्क्या रस्त्याअभावी दरवर्षी खरीप हंगामातील शेतीची कामे प्रभावित होत असून, शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहत आहे.
शेतात जाण्यासाठी असलेल्या या पांदण रस्त्यावर पावसाळ्यात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. खते, बियाणे, कीटकनाशके तसेच शेतीचे साहित्य शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहन नेणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांना डोक्यावर ओझे घेऊन चिखलातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे वेळ, श्रम आणि पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.
दरम्यान,रस्त्याच्या काही भागावर अतिक्रमण झाल्यामुळे पांदण रस्ता अरुंद झाल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाळ्यात रस्त्याची परिस्थिती आणखी बिकट होत असल्याने पिकांची वेळेवर निगा राखणेही अवघड होत आहे. परिणामी खरीप पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.
‘शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, तर शेती कशी करायची?’ असा संतप्त सवाल परिसरातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. खरीप हंगाम हातातून गेल्यास वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहू व हरभरा या पिकांवर अवलंबून राहावे लागते.
शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन भागी माहिरी–खापा पांदण रस्त्याचे मजबुतीकरण व दुरुस्ती करावी.तसेच रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून शेतकऱ्यांना बारमाही वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
मुख्यमंत्री बळिराजा शेत व पांदण रस्ते योजनेअंतर्गत हा रस्ता तातडीने मंजूर करून त्याचे काम सुरू करावे. तसेच आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी या प्रश्नात विशेष लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी भागी माहिरी व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here