Home Breaking News दूधबर्डीतील शेतकऱ्यांचा घनकचरा प्रक्रिया केंद्राला विरोध – उपोषणाचा इशारा

दूधबर्डीतील शेतकऱ्यांचा घनकचरा प्रक्रिया केंद्राला विरोध – उपोषणाचा इशारा

78
0

गिरीश आंदे
कळमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत सोनोली (नाईक) अंतर्गत येणाऱ्या दूधबर्डी येथील शेतकऱ्यांनी आज, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी, सावनेर यांना दिलेल्या निवेदनात प्रस्तावित घनकचरा प्रक्रिया केंद्र, बायोगॅस प्रकल्प तसेच विष्ठा गाळ प्रक्रिया प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी, वायूप्रदूषण आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करत प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की,मौजा दूधबर्डी येथील सर्वे क्रमांक ३१/२ मधील सुमारे ४.०४७ हेक्टर जागा या प्रकल्पासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. या ठिकाणी घनकचरा प्रक्रिया, बायोगॅस निर्मिती तसेच विष्ठा गाळ प्रक्रिया होणार असल्याने शेती, पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.
अर्जात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या प्रकल्पाविरोधात ग्रामसभेत चार वेळा ठराव मंजूर करून प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची दखल न घेता प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दूधबर्डी व सावंगी गावांची लोकवस्ती प्रस्तावित प्रकल्पस्थळापासून सुमारे ५०० मीटरच्या अंतरावर असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर असल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना व आक्षेपांचा गांभीर्याने विचार करून हा प्रकल्प अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान,मागणीची दखल न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर सामूहिक आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील,असा इशाराही शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जातून दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here