गिरीश आंदे
केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान खरीप २०२६-२७ अंतर्गत क्लोसर स्पेसिंग (सीएस) लागवड तंत्रज्ञान विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम ७ ऑगस्ट रोजी मौजा तेलकामठी येथे आयोजित करण्यात आला. समीर उमरेडकर यांच्या शेतावर झालेल्या या प्रशिक्षणात कापूस उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषी तंत्रज्ञान व प्रशिक्षण केंद्राचे प्रकल्प समन्वयक जी. ए. वैराळे यांनी उच्च घनता लागवड पद्धती (एचडीपीएस), क्लोसर स्पेसिंग (सीएस) आणि एकात्मिक कापूस व्यवस्थापन (आयसीएम) या कापूस लागवड तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
तसेच आत्माचे बीटीएम एस. एन. टेंभुरकर यांनी जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) योजनेविषयी माहिती दिली. जिल्हा नियोजन आराखडा २०२६-२७ अंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व सूचनांवर सखोल चर्चा करण्यात आली. कृषी यांत्रिकीकरण, शेती अवजारांची उपलब्धता, मजुरीचा खर्च कमी करणे, पीक विविधीकरणासाठी शासकीय मदत, महिला सक्षमीकरण, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर तसेच बाजारपेठ व शेतमाल विक्रीसंदर्भातील मागण्यांवर शेतकऱ्यांनी आपली मते मांडली.
कार्यक्रमास उपसरपंच उमराव भुजाडे, कृषी सहाय्यक स्नेहल गिऱ्हे, मोनाली कुंभारे,युक्ता सरप व कृषी सखी यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.कृषी विभाग, कळमेश्वर यांच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कापूस लागवड तंत्रज्ञानासह विविध शासकीय योजनांची माहिती मिळाली.




