गिरीश आंदे
नागपूर जिल्हा (ग्रामीण) पोलिस दलाच्या नव्याने मंजूर झालेल्या मोहपा पोलिस ठाण्याचे औपचारिक लोकार्पण शनिवारी दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. हे पोलिस ठाणे १३ जूनपासूनच नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित झाले असून, शनिवारी त्याचा औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला.
या वेळी खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार डॉ. राजीव पोतदार, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के, उपविभागीय अधिकारी सावनेर सागर खर्डे, मोहपा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर हनवते, भाजप नागपूर जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, मोहपा नगराध्यक्ष माधव चर्जन यांच्यासह लोकप्रतिनिधी, पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
नव्या पोलिस ठाण्यामुळे मोहपा परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम, तत्पर आणि प्रभावी पोलिस सेवा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तक्रार, माहिती अथवा मदतीसाठी नागरिकांनी मोहपा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
पोलिस पाटलांशी संवाद
दरम्यान, गोपाल सभागृहात नागपूर जिल्ह्यातील सुमारे ६०० पोलिस पाटलांसाठी कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री बावनकुळे यांच्यासह खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार डॉ. आशिष देशमुख व आमदार डॉ. राजीव पोतदार यांनी उपस्थित राहून पोलिस पाटलांशी संवाद साधला.
कार्यशाळेत महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध, सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गुन्हा घडल्यास तातडीने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमाला दोन हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती होती. पोलिस पाटील, अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




