गिरीश आंदे
कळमेश्वर तालुक्यातील तिष्टी खुर्द शिवारात शनिवारी (दि. १९ सप्टेंबर) वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसादरम्यान वीज पडून दोन चुलत भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. टिबुराज राजाराम कानफाडे (६४) आणि लक्ष्मण घनश्याम कानफाडे (५३) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही जनावरे चारण्यासाठी तिष्टी खुर्द शिवारातील पडाणात गेले होते. दुपारच्या सुमारास परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व विजांचा कडकडाट सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी दोघे शेतातील माता मायेच्या मंदिरात गेले होते. याचदरम्यान वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद आहे.
रात्री शोध घेतल्यानंतर दोघेही मंदिरात मृतावस्थेत आढळून आले. घटनास्थळाची पाहणी केली असता मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या कडुनिंबाच्या झाडाच्या खोडावर वीज पडल्याचा निशाण आढळल्याचे मोका पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोहपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून आवश्यक कार्यवाही केली. तसेच नायब तहसीलदार संदीप तडसे व तलाठी निता मेघरे यांनी घटनास्थळी पाहणी करून महसूल विभागाच्या वतीने मोका पंचनामा केला.
पोलिसांच्या तोंडी रिपोर्टसह महसूल विभागाच्या अहवालातही वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे नमूद आहे. मृतांचे नातेवाईक नामदेव टिबुराज कानफाडे यांनी पोलिसांना दिलेल्या तोंडी रिपोर्टमध्ये दोघांच्या मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते यांच्या मार्गदर्शनाखाली मोहपा पोलीस करीत आहेत.या दुर्दैवी घटनेने तिष्टी खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




