Home दुर्घटना सावनेरात वादळी पावसाचा कहर – दोन घटनांत दोघांचा मृत्यू,एक जखमी

सावनेरात वादळी पावसाचा कहर – दोन घटनांत दोघांचा मृत्यू,एक जखमी

2
0

गिरीश आंदे
सावनेर परिसरात शुक्रवारी पाऊस आणि जोरदार वादळामुळे घडलेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आते-मामे भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वोदय नगर येथील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ वीज पडून साहिल सत्तार शहा (२४) यांचा मृत्यू झाला, तर सावनेर येथील शिव मंदिराजवळ आंब्याचे झाड कोसळून मुस्ताक गुलाम शेख (४३), रा. चिचपुरा, सावनेर यांचा मृत्यू झाला. या घटनेत सचिन दियेवार, रा. गडेगाव हे जखमी झाले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
सर्वोदय नगर परिसरातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ पावसादरम्यान वीज पडण्याची घटना घडली. यात साहिल सत्तार शहा गंभीररीत्या बाधित झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान,सावनेर येथील शिव मंदिराजवळ पाऊस आणि जोरदार वादळ सुरू असताना आंब्याचे झाड अचानक कोसळले. यावेळी मुस्ताक गुलाम शेख आणि सचिन दियेवार हे दोघेही झाडाखाली दबले गेले.
घटनेची माहिती मिळताच सावनेरच्या पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते हितेश बन्सोड यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. क्रेन आणि जेसीबीच्या मदतीने झाड कापून दोघांना बाहेर काढण्यात आले. मुस्ताक गुलाम शेख यांना तातडीने सावनेरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. जखमी सचिन दियेवार यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृतक साहिल सत्तार शहा आणि मुस्ताक गुलाम शेख हे आपसांत आते-मामे भाऊ होते. एकाच कुटुंबातील दोन सदस्यांचा पाऊस आणि वादळाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनांमुळे सावनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दोन्ही घटनांप्रकरणी पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर पोलिसांकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here