गिरीश आंदे
विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच लोकशाही मूल्ये रुजावीत आणि संविधानाविषयी योग्य समज व आदर निर्माण व्हावा, यासाठी इयत्ता सहावीपासून शालेय अभ्यासक्रमात ‘संविधान’ हा स्वतंत्र विषय म्हणून शिकविण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी प्रिया रमेश मानकर यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ०८ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या दुष्काळग्रस्त पाहणी दौऱ्यानिमित्त कोहळी येथे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, प्रिया मानकर यांनी यासंदर्भातील लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केले.
या मागणीला बळ मिळण्यासाठी नागरिकांकडून गुगल फॉर्मच्या माध्यमातून त्यांची मते व प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या होत्या. तसेच, विविध शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधून त्यांच्याही प्रतिक्रिया मागवण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेतून शालेय स्तरावर संविधान हा स्वतंत्र विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे.
सध्या समाजमाध्यमांवर भारतीय संविधानाविषयी अपूर्ण माहिती, चुकीचे संदर्भ आणि “संविधान बचाओ” सारखे दिशाभूल करणारे संदेश प्रसारित केले जात आहेत. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम व गैरसमज निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना संविधानाची वस्तुनिष्ठ व योग्य माहिती असणे आवश्यक असून, शालेय स्तरापासूनच याची पायाभरणी होणे काळाची गरज आहे.
विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच संविधानाची उद्देशिका, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये, राज्याची मार्गदर्शक तत्त्वे, तसेच लोकशाही व्यवस्था व संविधानिक मूल्यांची ओळख करून दिल्यास त्यांच्यात संविधानाबद्दलचा आदर वाढीस लागेल. संविधानाने दिलेले अधिकार, त्यांचे संरक्षण आणि एक जबाबदार नागरिक म्हणून स्वतःची कर्तव्ये यांची जाणीव बालवयातच निर्माण होण्यास यामुळे मोठी मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या शिष्टमंडळ भेटीवेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार डॉ. राजीव पोतदार, भाजप काटोल जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाडे, कळमेश्वर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष धनराज देवके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इयत्ता सहावीपासून शालेय अभ्यासक्रमात ‘संविधान’ हा स्वतंत्र विषय समाविष्ट करा – प्रिया मानकर यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी;कोहळी येथील दौऱ्यात दिले निवेदन





