Home सामाजिक जागतिक महिला दिवस दिवसालाच साजरा न करता प्रत्येक दिवशी साजरा करावा –...

जागतिक महिला दिवस दिवसालाच साजरा न करता प्रत्येक दिवशी साजरा करावा – नितिन काकडे

16
0

तुकाराम लुटे (मौदा तालुका प्रतिनिधी)
मौदा :-
शासकीय सेवेत असताना जिल्हा परिषदेचा करोडोचा बजेट अचूकपणे नियोजनबद्ध करायचा, परंतु घरचा पंचवीस हजारांचा बजेट मला जमलेच नाही. ती फक्त आणि फक्त एक महिलाच करू शकते. म्हणून महिलांनी जागतिक महिला दिवस दिवसालाच साजरा न करता प्रत्येक दिवशी साजरा करावा असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत, विदर्भ प्रांताचे सचिव नितिन काकडे यांनी केले आहे. तर निरखून, पारखून सर्वात जास्त खरेदी महिलाच करतात, म्हणून ग्राहकांच्या मनातील सुचना ग्राहक संरक्षण २०१९ च्या कायद्यात असून खरी ग्राहकांची ओळख अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने करून दिली असल्याचे मत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी इतरही पाहुण्यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
महिलांचा आनंद द्विगुणीत व्हावा यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मौदा येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात सोमवार दि. १० मार्च रोजी साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अ.भा ग्राहक पंचायत, विदर्भ प्रांत चे सचिव नितीन काकडे, प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रकाश भुजाडे, माजी मौदा नगराध्यक्षा भारती सोमनाथे, भंडारा जिल्हाध्यक्ष प्रेमराज मोहकर, भंडारा नगर अध्यक्ष रविंद्र तायडे, प्रमुख वक्ते ॲड. मिनल रावते, डॉ. निलिमा घाटोळे उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाला लाभलेले वक्ते उपस्थित महिलांना कायदेविषयक सखोल मार्गदर्शन ॲड. मिनल रावते केले तर आरोग्यविषयक मार्गदर्शन डॉ. निलिमा घाटोळे यांनी केले.
स्त्री ही अबला नाही तर सबला आहे
  – भारती सोमनाथे
आज एकविसाव्या शतकात देखील घरात एक मुलगा आणि मुलगी असेल तर मुलालाच जास्त महत्त्व दिले जाते. मुलीला काय आयुष्यात चूल आणि मुलच करायचे आहे, असे सांगून प्रसंगी तिच्या शिक्षणाकडेही दुर्लक्ष केले जाते. मुलगी हे कायम परक्याचे धनच समजले जाते. जी भावना कुटुंबातून मनात रुजवली जाते. तिला समाजातही खतपाणी घातले जाते. ही अशी महिलांना दाबून ठेवणारी मानसिकता मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे. 
ही मानसिकता संपवायची असेल तर आम्हाला सुरुवात कुटुंबापासूनच करावी लागेल. स्त्री ही अबला नाही तर सबला आहे हे स्त्रीने अनेक उदाहरणातून दाखवून दिले आहे. हीच स्त्री प्रसंगी कुटुंबाचा आधार बनून कोलमडणाऱ्या कुटुंबाला सावरूही शकते हेही समाजाने बघितले आहे. आज मुलगी हे परक्याचे धन आहे, आणि मुलगा हा वंशाचा दिवा आहे, असे अजूनही बोलले जाते. मात्र आज कित्येक मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. त्याचवेळी मुलगी ही आई-वडिलांचा मुलगा बनवून त्यांना आधार देते अशी अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. ही मानसिकता आता आम्हाला बदलावी लागणारच आहे. त्यासाठी कुटुंबापासूनच आम्हाला सुरुवात करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांचा सत्कार
अ.भा. ग्राहक पंचायत च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मौदा येथे विविध शासकीय विभागांत कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांचा शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यात नगरपंचायत च्या मुख्याधिकारी डॉ. ऋचा धाबर्डे, नायब तहसीलदार योगिता दराडे, गटशिक्षणाधिकारी किरण चिनकुरे तसेच मौद्याची कन्या नवनियुक्त वैमानिक (पायलट) मृणाल (टिन्नू) ढोबळे यांचा समावेश आहे. सत्कारमूर्ती अधिकाऱ्यांनी महिलांना मार्गदर्शन करून आपापली मनोगत व्यक्त केली व आभार मानले आहे.
महिलांनी गावून-नाचून केला महिला दिन साजरा
कार्यक्रमादरम्यान हा कार्यक्रम माजी नगराध्यक्षा भारती सोमनाथे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संगीत खुर्ची सारखे खेळ, नृत्य सादर व गीत गावून महिला जागतिक दिन उत्साहात साजरा करून भेटवस्तू देण्यात आली. यात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
तत्पूर्वी सावित्रीबाई फुले, जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना रंगारी, संचालन वनिता अंबरते तर आभारप्रदर्शन निर्मला जर्वेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुकाराम लुटे, गौरी वैद्य, विजय पांडे, दिलिप सानगडीकर, दिनेश ढोबळे, नलिनी काटकर, दिगांबर बांगडकर, सुरेंद्र बम्नोटे, किरण अहेरकर, मोनाली तुपट, संगीता अहीर, उषा तलमले, सुभाष भदाडे, जयश्री बावनगडे, मनिषा निनावे, रोशनी बाळबुधे, वर्षा मरघडे, तणय लुटे, आदेश लुटे, प्रकाश जौंजाळकर, प्रशांत पवार, संजय गिरडे, डॉ. सुनिल बोरकर, देवेंद्र सोनटक्के आदिंनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here