गिरीश आंदे
महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्र उद्योगावरील वाढत्या आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर सर्व वृत्तपत्रांना जाहिरात दरात 150 टक्के वाढ देण्यात यावी तसेच विविध प्रशासकीय व जाहिरात धोरणांमध्ये बदल करण्यात यावेत, या मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया नागपूर तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे आज दिनांक 23 मार्च 2026 रोजी निवेदन देण्यात आले.
वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असून शासनाच्या योजना व निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो. मात्र 2019 पासून कागद, प्रिंटिंग साहित्य, केमिकल्स, वीज व मनुष्यबळ खर्चात सुमारे 150 टक्के वाढ झाली असताना शासनाच्या जाहिरात दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :
1)जाहिरात दरात तातडीने 150 टक्के वाढ करावी.
2)ई-टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध कराव्यात.
3)किमान जाहिरात आकार 200 चौ. से. निश्चित करावा.
4)जाहिरात देयके 30 दिवसांत अदा करावीत; विलंब झाल्यास व्याज द्यावे.
5)लघु व मध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वाटपात समान संधी द्यावी.
6)शासन निर्णय व बैठकींची माहिती पारदर्शकपणे प्रसिद्ध करावी.
7)सर्व जाहिराती माहिती खात्यामार्फतच देण्याची सक्ती करावी.
8)प्रलंबित तपासण्या व नैसर्गिक दरवाढीचे प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत.
तसेच, पत्रकारांना 10 वर्षांच्या सेवेनंतर अधिस्वीकृती पत्रिका देणे व 20 वर्षे सेवा व 55 वर्षे वय पूर्ण झालेल्या पत्रकारांना शंकरराव चव्हाण पत्रकारिता पेन्शन योजनेचा लाभ देण्यासाठी अटी शिथिल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर लाक्षणिक आंदोलन सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
“वृत्तपत्र उद्योग हा केवळ व्यवसाय नसून लोकशाहीचा पाया आहे. आर्थिक अडचणींमुळे तो कमकुवत झाल्यास जनतेच्या माहितीच्या अधिकारावर परिणाम होईल,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे, विनायक इंगळे, राहुल सावजी, संदीप पाटील, सतीश भालेराव, प्रमोद गाडगे, भाग्यश्री राखुंडे, नितेश गव्हाणे, गिरीश आंदे, संतोष धानोरकर,अनुप पठाणे आदी उपस्थित होते.




