गिरीश आंदे
विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून,प्रत्येक पात्र मतदाराने बीएलओंना आवश्यक कागदपत्रे वेळेत देऊन सहकार्य करावे. अन्यथा भविष्यात नाव वगळले जाणे किंवा माहितीतील त्रुटींचा फटका बसू शकतो,असा इशारा तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी विकास बिक्कड यांनी दिला.
मतदार यादी ही मतदानाच्या घटनात्मक अधिकाराचा आधार असल्याने ती अचूक व त्रुटीमुक्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचाही सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा असल्याचे विकास बिक्कड यांनी स्पष्ट केले.
सध्या बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची माहिती व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. यावेळी नागरिकांनी सहकार्य केल्यास भविष्यात नाव वगळले जाणे, चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची वेळ टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.
कळमेश्वर तालुक्यातील”एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि एकही अपात्र व्यक्तीचा समावेश होऊ नये,” या उद्देशाने व्यापक पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या सहभागातूनच विश्वासार्ह मतदार यादी तयार होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एसआयआर मोहिमेबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन करत विकास बिक्कड म्हणाले, “ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून प्रत्येक मतदाराच्या अधिकाराशी संबंधित महत्त्वाची मोहीम आहे. बीएलओंना पूर्ण सहकार्य करा,कागदपत्रे वेळेत सादर करा आणि मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करून घ्या. आजचा हलगर्जीपणा उद्या अडचणीचे कारण ठरू शकतो.”




