Home सांस्कृतिक व सामाजिक विदर्भाच्या पंढरीत आषाढी एकादशीला भक्तांचा जनसागर -३० जुलैला मुख्य सोहळा

विदर्भाच्या पंढरीत आषाढी एकादशीला भक्तांचा जनसागर -३० जुलैला मुख्य सोहळा

9
0

गिरीश आंदे
कळमेश्वर तालुक्यातील विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र धापेवाडा येथे आषाढी देवशयनी एकादशीनिमित्त स्वयंभू श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी शनिवारी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात पाच दिवसीय यात्रा महोत्सवाला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. हा महोत्सव ३० जुलैपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी रंगणार असून, मुख्य यात्रा सोहळा ३० जुलै रोजी होणार आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पहाटे ३ वाजल्यापासून श्रीविठ्ठल-रुक्मिणी भगवंतांचा अभिषेक व धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच आमदार डॉ. राजीव पोतदार व त्यांच्या पत्नी वर्षा पोतदार यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी आमदार सुधीर पारवे, उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार डहाट, तहसीलदार विकास बिक्कड, देवस्थान समितीचे उपाध्यक्ष भानुप्रतापसिंह पवार, सचिव आदित्यप्रतापसिंह पवार, विश्वस्त विलास वैद्य,प्रिया मानकर,अरुण चिखले,प्रभाकर रानडे,निखिल गडकरी,सरपंच मंगला शेटे, उपसरपंच मंगेश माले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी कोलबास्वामी मठ, रघुसंत मठ, मकरंद पुरी मठ आणि वारामाय देवस्थानाच्या दिंड्यांनी नगरप्रदक्षिणा काढत परिसर भक्तिमय केला. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी अभंग, हरिनाम आणि विठ्ठलनामाचा अखंड जयघोष केला. पालखी सोहळ्यात गावकरी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
यात्रेनिमित्त देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विविध स्वयंसेवी संस्थांनी चहा,महाप्रसाद व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे.
तसेच सावनेर, कळमेश्वर व नागपूर ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. दरम्यान, ३० जुलै रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत स्वयंभू श्रीविठ्ठल-रुक्मिणीची महापूजा होणार असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here