Home Breaking News केसर नाला पाणीटंचाईच्या बातमीची दखल! पितांबर ईखार यांचा मोफत टँकरने पाणीपुरवठ्याचा पुढाकार!

केसर नाला पाणीटंचाईच्या बातमीची दखल! पितांबर ईखार यांचा मोफत टँकरने पाणीपुरवठ्याचा पुढाकार!

2
0

गिरीश आंदे
कळमेश्वर
केसर नाला मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा घटल्याने तेलकामठीसह तेलगाव, सोनोली व नांदिखेडा या चार गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी पितांबर ईखार यांनी माणुसकीचा पुढाकार घेतला आहे. नील फार्मपासून दहा किलोमीटर परिसरातील पाणीटंचाईग्रस्त गावांना स्वतःच्या खर्चाने व स्वतःच्या टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. या उपक्रमासाठी लक्ष्मी आनंद फाउंडेशनच्या माध्यमातून सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्याकडे आवश्यक परवानगी व प्रशासकीय सहकार्य मिळवून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे नागपूर ग्रामीण (काटोल)चे कोषाध्यक्ष तसेच लक्ष्मी आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष पितांबर आनंदरावजी ईखार यांनी आपल्या निवेदनातून ही भूमिका मांडली आहे. त्यांच्या शेतात पाणीसाठा मुबलक असलेल्या दोन विहिरी असून, त्याद्वारे सुमारे २० एकर शेतीचे सिंचन केले जाते. मात्र, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी पाण्याचा वापर थांबवून दोन्ही विहिरींचे पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
केसर नाला प्रकल्पातील पाणीसाठा घटल्याने चार गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर, शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी पितांबर ईखार यांनी इंडिया लाईव्ह तेज न्यूजचे तालुका प्रतिनिधी गिरीश आंदे यांना व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली.
मौजा तेलकामठी येथील त्यांच्या शेतात दोन विहिरी असून, त्याद्वारे सुमारे २० एकर शेतीचे सिंचन केले जाते. असे असतानाही, दुष्काळसदृश परिस्थितीत शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा वापर थांबवून दोन्ही विहिरींचे पाणी जनतेसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. त्यानंतर आता नील फार्मपासून दहा किलोमीटर परिसरातील पाणीटंचाईग्रस्त गावांना स्वतःच्या टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती आणि अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या असल्याचे नमूद करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनतेसाठी जाहीर केलेल्या विविध उपाययोजनांच्या प्रेरणेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस पितांबर ईखार यांनी व्यक्त केला आहे.
“त्याच प्रेरणेतून सामाजिक बांधिलकी म्हणून, मी माझ्या लक्ष्मी आनंद फाउंडेशनच्या वतीने नील फार्मपासून दहा किलोमीटर परिसरातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये माझ्या स्वखर्चाने व स्वतःच्या टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करून जनसेवा करू इच्छितो. तरी मला हे पुण्यकार्य करण्यासाठी आवश्यक ती परवानगी व सहकार्य मिळवून द्यावे,” अशी नम्र विनंती त्यांनी निवेदनातून केली आहे.
शेतीच्या सिंचनासाठी पाण्याची गरज असतानाही, पाणीटंचाईच्या काळात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.
प्रस्तावित पाणीपुरवठा उपक्रमासाठी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्याकडे आवश्यक परवानगी व प्रशासकीय सहकार्य मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांना शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सादर करण्यात आली.
यावेळी सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिष देशमुख, भारतीय जनता पक्षाचे नागपूर ग्रामीण (काटोल)चे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे आणि माजी जिल्हाध्यक्ष अशोक धोटे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here