Home Breaking News हरविलेले ९ मोबाईल पुन्हा मालकांच्या हाती – सावनेर पोलिसांची यशस्वी कामगिरी!

हरविलेले ९ मोबाईल पुन्हा मालकांच्या हाती – सावनेर पोलिसांची यशस्वी कामगिरी!

21
0

गिरीश आंदे
नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील हरविलेले, गहाळ झालेले तसेच चोरीस गेलेले मोबाईल शोधण्याच्या विशेष मोहिमेंतर्गत सावनेर पोलिसांनी नऊ मोबाईल शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांना परत केले. ही कारवाई १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सावनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली मागील काही महिन्यांत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत सावनेर उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर पोलिसांनी सायबर पोलीस स्टेशन, नागपूर ग्रामीण यांच्या सहकार्याने तांत्रिक पद्धतीने मोबाईलचा शोध घेतला.
यासाठी केंद्र सरकारच्या सीईआयआर (CEIR) पोर्टलचा वापर करण्यात आला. या तांत्रिक प्रक्रियेद्वारे नऊ नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर सावनेर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांच्या हस्ते संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
मोबाईल हरविल्यास किंवा चोरीस गेल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. तसेच केंद्र सरकारच्या “www.ceir.gov.in” (https://www.ceir.gov.in) या अधिकृत पोर्टलवर आवश्यक माहिती भरून तक्रार नोंदवावी, असे आवाहन नागपूर ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून हरविलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यास मदत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here