Home Breaking News केसर नाल्यातील पाणीसाठा घटला – चार गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर!

केसर नाल्यातील पाणीसाठा घटला – चार गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर!

47
0

गिरीश आंदे
केसर नाला मध्यम प्रकल्पातील तलावात पाणीसाठा घटल्याने तेलकामठीसह तेलगाव, सोनोली व नांदिखेडा या चार गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायत तेलकामठीने संबंधित विभागांना पत्र देऊन पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी केली. कळमेश्वर तहसील कार्यालयाच्या वतीनेही ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पाणीटंचाई निवारण व नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. मात्र, १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे सांगण्यात येत असल्याने विभागांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायत तेलकामठीने संबंधित विभागांना दिलेल्या पत्रात केसर नाला प्रकल्पातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे आगामी काळात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रकल्पातून पंपाद्वारे पाण्याचा उपसा होत असल्याचाही मुद्दा पत्रात नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून चारही गावांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान,९ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती, कळमेश्वर येथे झालेल्या बैठकीत टंचाईग्रस्त गावांची माहिती, उपलब्ध पाणीस्रोत, टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण आणि पर्यायी व्यवस्था यांसारख्या मुद्द्यांवर नियोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. मात्र, बैठक आणि ग्रामपंचायतीचे पत्र यानंतरही संबंधित विभागांनी नेमकी कोणती कार्यवाही केली, हा प्रश्न कायम आहे.
पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता असतानाही संबंधित विभागांनी वेळेत उपाययोजना करणे अपेक्षित आहे. उपलब्ध पाणीसाठ्याची सद्यस्थिती जाहीर करणे, पाण्याच्या उपशावर आवश्यक नियंत्रण ठेवणे आणि चारही गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे.
पाणीटंचाई गंभीर झाल्यानंतरच संबंधित विभागांना जाग येणार का, असा सवाल परिसरातील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here