Home Breaking News वन्यजीव सप्ताहानिमित्त मोफत रोपे व दुर्वा वाटप उपक्रमाने भाविकांमध्ये पर्यावरण प्रेम जागवले

वन्यजीव सप्ताहानिमित्त मोफत रोपे व दुर्वा वाटप उपक्रमाने भाविकांमध्ये पर्यावरण प्रेम जागवले

61
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय,कळमेश्वर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. १ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने आणि पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून मौजा आदासा येथील प्रसिद्ध श्री गणेश मंदिर परिसरात भाविकांना मोफत मिश्र रोपे आणि दुर्वा वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात गणेशपूजेत वापरल्या जाणाऱ्या २१ पवित्र वृक्षप्रजातींचे धार्मिक, सांस्कृतिक आणि औषधी महत्त्व भाविकांना समजावून सांगण्यात आले. या वृक्षांमध्ये बेल, आंबा, पिंपळ, डाळिंब, दुर्वा, मरुवा, देवदार, हराळी, शमी, तुळस, धोत्रा, आघाडा, रुई, हिंगुळ, लाजाळू, अर्जुन, बोर, निर्गुंडी, मगवॉट, कटेरी आणि एंजल जास्मिन यांचा समावेश होता.
भाविकांना सांगण्यात आले की या सर्व वृक्षांचा उल्लेख गणेशपूजेत वापरल्या जाणाऱ्या “एकवीस पत्री” मध्ये असून, ते केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर औषधी व पर्यावरणीय दृष्ट्याही अत्यंत उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ, बेल व पिंपळ हे वायुप्रदूषण शोषक वृक्ष आहेत, तर तुळस, रुई व आघाडा यांना औषधी गुणधर्म लाभलेले आहेत.
सदर उपक्रमात एकूण १००१ मिश्र रोपे आणि ५०१ दुर्वा रोपांचे वाटप करण्यात आले. रोपे घेतलेल्या भाविकांना “एक झाड लावा, पर्यावरण वाचवा” या संदेशासह झाडे लावण्याचे आणि त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान निसर्ग, वृक्ष, वन्यजीव, पर्यावरण व प्रदूषण संरक्षण या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वन्यजीव संवर्धन, मानव–वन्यजीव संघर्षाची कारणे व उपाययोजना, नामशेष होणाऱ्या प्रजातींचे रक्षण आणि अवैध वृक्षतोडीचे दुष्परिणाम याविषयीही जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी पी. आर. सिरपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी वनपाल के. एम. जामगडे,सार्वे, ढोके,वाटकर, तसेच वनरक्षक आर. एस. हुलकाने,एम. सी. बोपटे,डी.के.पडवाल,मोहड,लामसे,पाटील,बदोले आणि कर्मचारी वसंता काहाते,प्रकाश उईके,कृष्णा मानमोडे,बालू नागपुरे,मंगेश पांडे व राकेश बावणे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी भाविकांनी वनविभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करत “गणेश पूजनाबरोबर पर्यावरण पूजन” ही भावना जपणारा हा उपक्रम दरवर्षी राबवावा, अशी इच्छा व्यक्त केली.
या उपक्रमामुळे भाविकांमध्ये निसर्ग, वृक्ष, वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता वाढून पर्यावरणप्रेमाची नवी भावना निर्माण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here