नागपूर
दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात भव्य आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय धनगर युवक मंडळासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ही बैठक रविवारी दुपारी २ वाजता बालाजी नगर येथील स्वाती अपार्टमेंटमधील संघटनेच्या कार्यालयात संपन्न झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच सकल धनगर समाज समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे होते. बैठकीदरम्यान धनगर समाजाच्या आरक्षणासह इतर महत्त्वाच्या सामाजिक व आर्थिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.अखेर हिवाळी अधिवेशनावेळी सरकारच्या दुर्लक्षणाचा निषेध म्हणून भव्य आक्रोश मोर्चा काढण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.बैठकीत मोर्चाच्या आयोजन आणि नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करून, पुढील नियोजन बैठकीसाठी दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी गजानन महाराज सभागृह, मानेवाडा, बालाजी नगर येथे विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील धनगर समाज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
या बैठकीस धनगर युवक मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील, देविदास आगरकर, प्रा. बाबा टेकाडे, प्रकाश वारे, अशोक चांभारे, देवराव कुहीटे, विलास डाखोळे, दीपक अवताडे, ताराचंद बांबल, टेकचंद ढोले, नामदेव साव, राजेंद्र चांभारे, नामदेव खाटके, साहेबराव सरोदे यांसह नागपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




