Home कृषी कळमेश्वरमधील ८१२ पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजनेची यादी प्रसिद्ध – तहसीलदार विकास बिक्कड...

कळमेश्वरमधील ८१२ पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजनेची यादी प्रसिद्ध – तहसीलदार विकास बिक्कड यांचे तातडीने आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

85
0

गिरीश आंदे
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक दिलासा देण्याबरोबरच नव्याने पीककर्ज उपलब्ध करून शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ शासन निर्णयान्वये २ जून २०२६ रोजी जाहीर केली आहे. तसेच १५ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह प्रति शेतकरी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीककर्जाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत न फेडलेल्या कर्जांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनी अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर त्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून त्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या तरतुदीमुळे मोठी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.
कर्जफेडीची शिस्त कायम ठेवण्यासाठी शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभाची तरतूद केली आहे. त्यामुळे प्रामाणिक कर्जदारांना प्रोत्साहन मिळून बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ अंतर्गत कळमेश्वर तालुक्यातील ८१२ पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी संबंधित गावांच्या ग्रामपंचायत कार्यालय, गावचावडी, विविध कार्यकारी सेवा संस्था तसेच संबंधित बँक शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यादीतील पात्र शेतकऱ्यांनी आपला विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विकास बिक्कड आणि सहाय्यक निबंधक मिलिंद भालेराव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here