गिरीश आंदे
कळमेश्वर तालुक्यातील मौजा वरोडा येथे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) मार्फत प्रस्तावित नागपूर बाह्य रिंगरोड प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या शेतीजमिनींच्या प्रश्नावर बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी ग्रामपंचायत वरोडा येथे सरपंच सौ. संगीता भूपेश वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. सभेमध्ये शासनाकडून प्राप्त झालेल्या बाह्य रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या यादीचे वाचन करण्यात आले तसेच शासनाच्या संमतीपत्राबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्याचा दर जाहीर न करता केवळ संमतीपत्र मागविण्यात येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शेती संपादित झाल्यानंतर अनेक कुटुंबे भूमिहीन होतील, उपजीविकेचे प्रमुख साधन हिरावले जाईल आणि बेरोजगारीसह विविध सामाजिक समस्या निर्माण होतील, अशी भूमिका उपस्थित शेतकऱ्यांनी मांडली. त्यामुळे लेखी संमती घेतल्याशिवाय कोणतीही जबरदस्तीची कारवाई करू नये आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय जमीन संपादनास संमती देणार नसल्याचा एकमुखी निर्णय सभेत घेण्यात आला.
यानंतर ग्रामपंचायतीने संबंधित ठराव मंजूर करून तो उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित विभागांकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी बाधित शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी सावनेर कल्याणकुमार दहाट तसेच तहसीलदार कळमेश्वर विकास बिक्कड यांना सामूहिक निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडल्या.
यावेळी सरपंच संगीता भूपेश वासनिक, उपसरपंच हिरालाल भाऊराव डाखोरे यांच्यासह घनश्याम खडसे, दिलीप काकडे, अज्जू पठाण, नरेश राऊत, रोहित हिवरे, सुधाकर काकडे, गजानन डाखोरे, कोठेराम पुसदकर, विलास बेंडे, पुंडलिक बांबल, नरेंद्र डाखोळे, शांताराम हिवरे, नारायण खडसे, बळवंत राऊत, उत्तम राऊत, अमोल डाखोळे तसेच वरोडा गावातील मोठ्या संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते.
सभेअंती सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून योग्य मोबदला, पुनर्वसन आणि लेखी संमतीशिवाय कोणतीही जमीन संपादनाची कारवाई करू नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली.
Home कृषी नागपुर बाह्य रिंगरोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध – वरोडा ग्रामपंचायतीचा ठराव, प्रशासनाला सामूहिक...




