संतोष धानोरकर (सावनेर प्रतिनिधी)
सावनेर,दि. १३ महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाच्या वतीने स्थानिक विश्रामगृहाच्या सभागृहात गुरुवारी (दि. १३) दुपारी ४ वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी विचारांचा आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रा. बाबा टेकाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जय शिवाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश इंगोले, भगवान चांदेकर, संजय टेंभेकर, यशवंत पाटील, गुलाब टेकाडे, संजय राऊत, अतुल राऊत, ज्ञानेश्वर गोहत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पूजाअर्चा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित समाजबांधवांनीही प्रतिमेस अभिवादन केले.अध्यक्षीय भाषणात प्रा. बाबा टेकाडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचे, न्यायप्रियतेचे, दातृत्वाचे आणि समाजसेवेचे स्मरण करून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “राजमाता अहिल्यादेवींनी आपल्या कर्तृत्वाने आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ निर्माण केला. प्रजाहिताला सर्वोच्च स्थान देत त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, धर्मशाळा तसेच विविध धार्मिक व सामाजिक सुविधा उभारल्या. त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”
यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले. अहिल्यादेवींच्या विचारांचा आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी समाजबांधवांनी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे संचालन शुभम ढवळे यांनी केले, तर यशवंत पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित सुरजुसे, नंत्थू तातोडे, सचिन कोचे, जगन्नाथ बंजारा आदींनी सहकार्य केले.याप्रसंगी सावनेर तालुक्यातील विविध गावांतील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




