Home Breaking News वन्यजीव सप्ताहानिमित्त लिंगा-लाडई येथे मोफत पशुलसीकरण शिबिर यशस्वी

वन्यजीव सप्ताहानिमित्त लिंगा-लाडई येथे मोफत पशुलसीकरण शिबिर यशस्वी

93
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
वनविभाग, नागपूरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही १ ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत मौजा लिंगा-लाडई (ता. कळमेश्वर) येथे पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमास ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि वन्यजीव प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराचे उद्दिष्ट

शिबिराचा उद्देश पाळीव प्राण्यांमधील संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवणे, वन्य आणि पाळीव प्राण्यांतील आरोग्य साखळी मजबूत करणे, लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे व ग्रामस्तरावरून वन्यजीव संवर्धनात सक्रिय सहभाग वाढवणे हा होता.
शिबिराचे ब्रीद होते – “निरोगी प्राणी, सुरक्षित वन्यजीव, संतुलित पर्यावरण.”

आरोग्य सेवा व लसीकरण

शिबिरात पशुवैद्यकीय पथकाने FMD (तोंडखुरी-पायखुरी) लस व PPR लसीकरण यासह गर्भ तपासणी, कृत्रिम रेतन सेवा, खचचीकरण, औषधोपचार व लहान शस्त्रक्रिया अशा वैद्यकीय सेवा दिल्या.
या शिबिरात एकूण ७७५ प्राण्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये गायी, बैल, म्हशी, वासरे, बकऱ्या, कुत्रे व शेळ्या यांचा समावेश होता.

मान्यवरांची उपस्थिती

या शिबिरास मा. डॉ. विनिता व्यास (उपवनसंरक्षक, नागपूर) या अध्यक्षस्थानी होत्या. सहाय्यक वनसंरक्षक मा. पांडुरंग पाखले, डॉ. अश्विनी कांबळे, तसेच स्थानिक सरपंच, उपसरपंच व वन्यजीव रक्षक उपस्थित होते.

वैद्यकीय पथकाचे योगदान

शिबिरासाठी डॉ. अश्विनी कांबळे, डॉ. कविता घनबहाद्दूर, डॉ. विद्याधर घनबहाद्दूर, डॉ. मयूर काटे, डॉ. मयूर पारसे, डॉ. राजेश फुलसंगे, डॉ. प्रियल चौरागडे, डॉ. सिद्धार्थ मोरे, डॉ. सचिन खूबाळकर, डॉ. चंद्रकांत गडपाले यांचे योगदान लाभले. त्यांना पशुधन पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

आयोजन व जनसहभाग

कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी पी. आर. सिरपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वनपाल, वनरक्षक, वनमजूर, पत्रकार, ग्रामस्थ, पशुपालक, तसेच गोसामी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

समारोप व संदेश

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी “निरोगी पशुधन म्हणजे समृद्ध निसर्ग” हा संदेश ठळकपणे मांडण्यात आला. लसीकरणामुळे रोगप्रसार रोखता येतो व जैवविविधतेचे संतुलन राखता येते. पी. आर. सिरपूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानत वन्यजीव संवर्धनासाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here