सावनेर
सन 1969 मध्ये बांधण्यात आलेली आणि 1972 पासून कार्यरत असलेली नगरपरिषद पाण्याची टाकी आजही सावनेरवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. मात्र, जवळपास 53 वर्षे उलटून गेल्यानंतरही सावनेरकरांना त्याच जुन्या, जर्जर आणि धोकादायक अवस्थेतील टाकीचेच पाणी प्यावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.टाकीची पाहणी ही सावनेर शहराध्यक्ष गजुभाऊ चौधरी आणि जिल्हा सह-संघटन मंत्री संजय राऊत यांनी केली असता खालील गोष्टी निदर्शनात आली.
मुख्य निरीक्षणे :-
1) टाकीवरील जिना पूर्णतः मोडकळीस आलेला असून अत्यंत धोकादायक स्थितीत आहे.
2) पाण्याची लेव्हल तपासण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा निकामी झाली आहे.
3) पाणी शुद्ध आहे असा दावा असला तरी घराघरात पोहोचणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेत मोठा फरक जाणवतो.
4) जुनी व नादुरुस्त पाइपलाईनमुळे सांडपाण्याचा पिण्याच्या पाण्यात मिसळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
5) पाणी टाकीचे स्वच्छतेचे काम केवळ कागदावरच दिसते, प्रत्यक्षात टाकी अत्यंत अस्वच्छ अवस्थेत आहे.
शहराध्यक्ष गजुभाऊ चौधरी यांनी ठामपणे सांगितले की, “टाकीतून निघणारे पाणी जरी शुद्ध असले, तरी सावनेर शहरात नागरिकांच्या घरी पोहोचणारे पाणी मात्र अत्यंत गढूळ आणि दूषित आहे. अनेक ठिकाणी पाईपलाइन लीक झाली असून त्यातून सांडपाण्याचा शिरकाव होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या पाइपलाइनचे योग्य निरीक्षणच झालेले नाही. त्यामुळे नगरपरिषदेनं तातडीने याची गंभीर दखल घेऊन संपूर्ण पाईपलाईनचे सर्वेक्षण करावे व योग्य उपाययोजना करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करावे.”
संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या जुना झालेल्या पाणीपुरवठा प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. नगरपरिषदेने ही टाकी नव्या मशिनरीसह सज्ज करून जनतेसाठी सुरक्षित व शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू ठेवावा.”
आम आदमी पार्टीने मागणी केली की, सावनेरकरांच्या आरोग्याशी खेळ मुळीच सहन केला जाणार नाही. नगरपरिषदेला याचे गांभीर्य लक्षात घेऊन या टाकीचा पुन्हा नव्याने विकास व पाइपलाईनची तातडीने तपासणी करावी लागेल.
या वेळी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष पंकज घाटोडे, जिल्हा महासचिव जामुवंत वारकरी आणि तालुका सह-संघटन मंत्री योगेश राऊत व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. टाकीची पाहणी करताना त्यांनी टाकीच्या अवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
Home Breaking News आम आदमी पार्टीने केली तीव्र शब्दांत मागणी – “जीवनदायिनी टाकीची पुनर्बांधणी तातडीने...




