गिरीश आंदे
सावनेर येथे आज १२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या. दुपारी १२.३० वाजल्यापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या.
मात्र या संवादात एका तक्रारीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि प्रशासनात खळबळ उडाली. कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी ते हेटी (नंदाजी) ग्रा.मा. १९ रस्त्यावर सी.डी.वर्क बांधण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
या रस्त्यावर सी.डी.वर्कसाठी गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार अर्ज, तक्रारी व पाठपुरावा करण्यात आला. विविध विभागांनी मोका चौकशी करून कामाचे आदेशही दिले, मात्र प्रत्यक्षात कामच झाले नसल्याचा गंभीर आरोप शेतकरी देविदास बाबुराव तुरणकर यांनी केला.
तक्रारदाराचा आरोप असा की, संबंधित ठेकेदाराकडून आर्थिक लाभ घेतल्याने काम झाले नसतानाही ‘काम पूर्ण’ असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे. उपविभागीय अभियंता राजेश पुल्लरवार (जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, सावनेर) यांनी इतर विभागांसोबत संगनमत करून प्रकरण निकाली निघाल्याचे दाखवले असल्याचा थेट आरोप करण्यात आला.
“काम प्रत्यक्षात नाही, पण फाईलमध्ये सर्व काही सुरळीत!” असा सवाल उपस्थित करत शेतकरी तुरणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागितला.
या तक्रारीमुळे ‘विकासाच्या नावाखाली कागदावरच कामे पूर्ण होत आहेत का?’ असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तक्रारीची दखल घेत सखोल चौकशीचे संकेत दिल्याने आता प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Home समस्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात थेट संवादात शेतकऱ्याने केला ‘कागदोपत्री विकासा’चा भांडाफोड !




