Home कृषी शेतकरी निळकंठ ढेंगळे यांची हरदोली-खानगाव पांधण रस्त्यावर सीडी वर्क व पाणी निचऱ्याच्या...

शेतकरी निळकंठ ढेंगळे यांची हरदोली-खानगाव पांधण रस्त्यावर सीडी वर्क व पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेची तहसीलदारांकडे मागणी

23
0

गिरीश आंदे
हरदोली ते खानगाव दरम्यान सुरू असलेल्या बळीराजा पांधण रस्त्याच्या कामात आवश्यक ठिकाणी सीडी वर्क करण्यात यावे तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी सरकारी नाल्यापर्यंत मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी सोनपूर येथील शेतकरी निळकंठ बाळकृष्ण ढेंगळे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ढेंगळे यांच्या शेतालगत हरदोली ते खानगाव शिवपांधण रस्त्याचे काम सुरू आहे. त्यांच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक १७१ मधील शेतालगतच्या रस्त्यावर सीडी वर्कची आवश्यकता असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. यापूर्वी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह नसल्याने या ठिकाणी सीडी वर्क करण्यात आले नव्हते. मात्र सध्या सुरू असलेल्या कामामुळे भविष्यात पाणी साचून शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
शेताच्या उजव्या बाजूस हरदोली गावाच्या हद्दीपासून काही अंतरावर सरकारी नाला असून, पावसाचे पाणी त्या नाल्यापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तहसील प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून मौका पंचनामा करावा तसेच सीडी वर्कसह पाणी निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here