सावनेर
नगरपरिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता २ डिसेंबर २०२५ च्या मतदानाकडे लागले आहे. नगराध्यक्षपदासाठी सहा दमदार उमेदवार रिंगणात असून स्थानिक राजकारणात चुरशीची लढत रंगताना दिसत आहे.
या निवडणुकीत मतदारांची पसंती कोणाला मिळणार, यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. सगळ्यांचीच वैचारिक चाचणी, पक्षांची संघटनशक्ती, स्थानिक प्रश्नांवरील भुमिका आणि वैयक्तिक जनाधार— या सर्व बाबी निवडणुकीच्या गणिताला वेगवेगळे रंग देताना दिसतात.
भाजपच्या संजना मंदार मंगळे :- संघटनाचा मजबूत पाया भाजपची परंपरागत ताकद, गावोगावची कार्यकर्त्यांची नाळ आणि मागील निवडणुकांतील प्रभाव लक्षात घेता संजना मंगळे यांचे उमेदवारी निश्चितच चर्चेत आहे. विकासकामांवर भर देण्याचा पक्षाचा दावा मतदारांवर कितपत परिणाम करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार.
काँग्रेसच्या सीमा सुनील चापेकर :- पारंपरिक मतदारांवर भिस्त काँग्रेसने सीमा चापेकर यांना पुढे केले आहे. स्थानिक पातळीवरील वैयक्तिक संपर्क, स्त्री-शक्तीचा आधार आणि पारंपरिक मतदारांची निष्ठा— हे त्यांचे बलस्थान ठरू शकते.
सावनेर नगर विकास आघाडीच्या सुनिता अरविंद लोधी : स्थानीक मुद्द्यांवर धार स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणारी ही आघाडी गेल्या काही वर्षांत पर्याय म्हणून पुढे येत आहे. सुनिता लोधी यांचा मांडणीतील आत्मविश्वास मतदारांची मने ओढू शकतो.
राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या वैशाली गोपाल घटे :- नव्या समीकरणांची धडपड राष्ट्रवादीत झालेल्या विभागणीनंतर स्थानिक पातळीवर नव्या समीकरणांची निर्मिती झाली असून वैशाली घटे या या समीकरणांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.
आम आदमी पक्षाच्या आश्विनी पंकज घाटोळे :- स्वच्छ राजकारणाचा मुद्दा आप पक्ष नव्या, पारदर्शक राजकारणाच्या नावावर मतदारांपर्यंत पोहोचत असून तरुण मतदारांचा प्रतिसाद त्यांच्या बाजूने जाऊ शकतो.
अपक्ष इंदिरा झोडापे :- वैयक्तिक जनाधाराचा जोर अपक्ष उमेदवारांमध्ये इंदिरा झोडापे या ओळखीचे आणि लोकसंग्रह असलेल्या उमेदवार म्हणून चर्चेत राहू शकतात.
तर मग बाजी मारणार कोण?
सावनेरची ही लढत सरळसोट नसून बहुकोनी आणि चुरशीची आहे. कोणाला स्पष्ट वाढत चाललेली लाट दिसत नसली, तरी स्थानिक पातळीवर भाजप व काँग्रेसमध्ये काटा टोकाचा, तर उर्वरित आघाड्यांचे उमेदवारही समीकरणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
अंतिम बाजी मात्र मतदारांच्या मनात दडलेली असून त्यांच्या अपेक्षा—नागरी सुविधा, पाणी, रस्ते, स्वच्छता आणि प्रामाणिक कारभार— यावरच नगराध्यक्षांची ताजपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, ते ठरणार.




