नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आणि काटोल पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत गांजा तस्करीचे एक मोठे आंतरराज्यीय रॅकेट उघडकीस आणले आहे. २५ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी तब्बल ३३ किलो ६०० ग्रॅम गांजा जप्त केला असून, या गुन्ह्याचे धागेदोरे थेट ओडिसा राज्यापर्यंत पोहोचले आहेत. आरोपींनी नारळाच्या व्यापारासाठी खोली भाड्याने घेतली असल्याचे भासवून तिथे गांजाची साठवणूक केली होती. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण १७ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक गस्तीवर असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, काटोल शहरातील चांडक ले-आऊट, वार्ड क्रमांक ७ मधील गणेश मंदिराजवळ असलेल्या रमेशराव गजभिये यांच्या घरी समीर राऊत याने भाड्याने घेतलेल्या खोलीत गांजा लपवून ठेवला आहे. या माहितीच्या आधारे पथकाने काटोल पोलिसांच्या मदतीने तात्काळ घटनास्थळी छापा टाकला. तिथे समीर विजयराव राऊत, सचिन भागवत झोड आणि छगन प्रीतम चरपे हे तिघे आढळून आले. पोलिसांनी विचारपूस केली असता समीर राऊत याने ही खोली आपण नारळाच्या व्यापारासाठी घेतली असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना संशय असल्याने त्यांनी खोलीची झडती घेतली असता तिथे गांजाचा मोठा साठा आढळून आला.
पोलिसांनी आरोपींकडे अधिक कसून चौकशी केली असता या तस्करीची व्याप्ती समोर आली. आरोपी समीर राऊत आणि वैभव दिलीपराव काळे यांनी पैसे पुरवून हा गांजा मागवला होता. यासाठी त्यांनी छगन चरपे, सचिन झोड, सुरज सुपटकर आणि विशाल शेभेंकर यांना ओडिसाला पाठवले होते. या आरोपींनी बालंगीर (ओडिसा) येथून महेंद्र बोलेरो पिक-अप वाहनाने (क्र. एम.एच. ४० डी.सी. ००९३) हा गांजा तस्करी करून काटोलमध्ये आणला होता. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ७२ हजार रुपये किमतीचा ३३.६०० किलो गांजा, तस्करीसाठी वापरलेले बोलेरो वाहन, तीन अँड्रॉइड मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण १७ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला आहे. याप्रकरणी काटोल पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८ (क), २० (ब), २२ आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
ही महत्वपूर्ण आणि मोठी कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच रामटेक उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अजितसिंग देवरे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण भीमटे आणि अंमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.




