Home सामाजिक आंतरजातीय वधू-वर परिचय मेळाव्याने दिली समाजाला नवी दिशा – कामाक्षी सेलिब्रेशनमध्ये सामाजिक...

आंतरजातीय वधू-वर परिचय मेळाव्याने दिली समाजाला नवी दिशा – कामाक्षी सेलिब्रेशनमध्ये सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश

25
0

गिरीश आंदे
आज दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी तैली युवा एकता मंच व कामाक्षी युनिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज कामाक्षी सेलिब्रेशन, सावनेर येथे सर्व जाती-धर्मातील इच्छुक युवक-युवतींसाठी अंतरजातीय वधू-वर परिचय मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले. समाजातील विवाहप्रश्नाला सकारात्मक दिशा देणाऱ्या या अभिनव उपक्रमाला युवक-युवतीं तसेच त्यांच्या परिवाराकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्राची भगत यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.चंद्रकांत पिसे, विवेक मोवाडे, डॉ. मर्फी गजबिये आणि चंद्रशेखर धवड प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत, समाजातील बदलत्या गरजांना अनुरूप असा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी सावनेर तालुक्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानही करण्यात आला. निशुल्क सेवेद्वारे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे आणि आपल्या गुरुकुलाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविणारे *भाऊसाहेब गोतमारे*, अनेक वर्षांपासून सातत्याने भजनसेवा देत अध्यात्मिक वातावरण निर्माण करणारे *भगवंता मोरे*, तसेच प्रतिकूल परिस्थितीत अथक परिश्रम करून आपल्या कन्या खुशी चवारे हिला मिस महाराष्ट्र पदापर्यंत पोहोचविणाऱ्या प्रेरणादायी माता *मनीषा चवारे* यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. विशेषतः भगवंता मोरे यांच्या मधुर व मंत्रमुग्ध करणाऱ्या भजनसेवेचे आणि भाऊसाहेब गोटमारे यांच्या विद्यार्थीकेंद्रित कार्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. तर मनीषा चावरे यांच्या संघर्षमय मातृत्वाने अनेक पालकांसाठी प्रेरणेचा आदर्श निर्माण केला.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आज विवाहाचा प्रश्न समाजासमोर गंभीर स्वरूपात उभा आहे. अशा वेळी अंतरजातीय वधू-वर परिचय मेळाव्यासारखा नवा आणि दूरदृष्टीचा उपक्रम समाजाला नवी दिशा देणारा ठरत आहे. आयोजकांनी दाखविलेली ही सामाजिक बांधिलकी निश्चितच अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी तैली युवा एकता मंच व कामाक्षी युनिटी फाउंडेशनचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी समाजहिताचे असे उपक्रम सातत्याने राबवत राहावेत, अशी आग्रहाची विनंती पंकज घाटोडे यांच्याकडे करण्यात आली.
हा मेळावा केवळ परिचयाचा मंच न ठरता सामाजिक एकात्मता, प्रगत विचार आणि समाजजागृतीचा प्रभावी संदेश देणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here