गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर (MRSAC) यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध डिजिटल कृषी उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी कर्नाटक राज्यातील कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने आज नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्याला भेट दिली.
या अभ्यास दौऱ्यात कर्नाटक राज्याचे अतिरिक्त कृषी संचालक सी.बी. बालारेड्डी आणि के. मधुसूदन, कृषी सहसंचालक श्रीमती एस.एम. दिपजा,श्रीमती एच.बी. शोभा, श्रीमती शोभा पाटील, व्हावे कुमार यांसह इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
या चमूसोबत जिल्हा कृषी उपसंचालक दत्तात्रय येळे व तालुका कृषी अधिकारी दिपाली कुंभार उपस्थित होते. कळमेश्वर तालुक्यातील विविध ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या डिजिटल उपक्रमांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
सुरुवातीला चमूने युनिव्हर्सल बायोटेक माती परीक्षण प्रयोगशाळा, कळमेश्वर येथे भेट देऊन सहाय्यक कृषी अधिकारी प्रेमराज फलके यांनी सादर केलेल्या जमिनीचे आरोग्य सुधारणा मोहिमेअंतर्गत मोबाईल ॲपचा वापर या प्रात्यक्षिकाचे अवलोकन केले. त्यानंतर आयरिस ऍग्रो फॉर्म ट्रेनिंग सेंटर, सावंगी तोमर येथे सेंद्रिय शेती, गांडूळखत, कंपोस्ट खत प्रकल्प याबाबत सविस्तर माहिती संचालक सुनील कोंडे यांनी दिली.
यानंतर मौजा सुसुंद्रि येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी विभागाने राबविलेल्या महाकृषी विस्तार एआय ॲप, ई-पीक पाहणी ॲप, ई-पंचनामा, सीसीई ॲप, महाडीबीटी ॲप, शेतीशाळा (FFS) ॲप, पोकरा डीबीटी ॲप, क्रॉपसैप, हॉर्टसैप आदी ॲप्सची माहिती प्रत्यक्ष डेमोद्वारे घेतली.
तसेच नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नारायणराव चौधरी यांच्या शेतावर सेंद्रिय निविष्ठा, सॉलिडॅरीडॅड कंपनीच्या CSR उपक्रमातून उभारलेल्या हवामान केंद्राची पाहणी करण्यात आली. पुढे मारोतरावजी दहाड यांच्या संत्रा व कापूस शेतीवरील डिजिटल ॲप वापराचा अनुभव जाणून घेतला.
शेवटी मौजा कोहळी येथील कोहळी क्षेत्र फार्मर प्रोड्युसर कंपनी ला भेट देऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला.



