सावनेर
नगरपरिषद निवडणुकीची नामांकन प्रक्रिया अंतिम टप्प्यात येत असतानाच सावनेरच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. भाजप पक्षश्रेष्ठीकडे दिलेल्या प्रस्तावावर अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नगर विकास आघाडीचे नेते आणि वरिष्ठ वकील ॲड. अरविंद लोधी यांनी स्वतंत्र आघाडी उभारून नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागांतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.
भाजप-आघाडी युतीचा मागील २८ वर्षांचा इतिहास असतानाच या वेळेस समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. १९९७ पासून सतत सत्ता वाटून घेणाऱ्या दोन्ही गटांमध्ये आता मतभेद उफाळले आहेत. सावनेर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर स्थानिक पातळीवर काँग्रेस निष्क्रिय दिसत असताना भाजपने पुन्हा एकहाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, लोधींच्या या हालचालींमुळे भाजपला मोठे राजकीय खिंडार बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आघाडीने यापूर्वी नगराध्यक्षपद आणि काही प्रभागांवरील उमेदवारीची मागणी करणारा प्रस्ताव भाजप नेतृत्वाकडे पाठविला होता. पण वेळ निघूनही योग्य निर्णय न झाल्याने आघाडीने ‘स्वबळावर लढण्याचा’ मार्ग निवडला आहे.
ॲड. लोधी यांनी सांगितले की, “आम्ही आघाडीच्या वतीने स्पष्ट प्रस्ताव दिला होता. निवडणूक प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असूनही निर्णय न झाल्याने आम्ही स्वबळावर आघाडी निर्माण करून मैदानात उतरत आहोत. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आम्ही नामांकन अर्ज दाखल करणार आहोत.”
या घडामोडींमुळे सावनेर पालिका निवडणुकीच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ होण्याची शक्यता असून, भाजपसमोर आता नव्या समीकरणांचा मोठा पेच निर्माण झाला आहे.




