गिरीश आंदे
तेलकामठी राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ व्या वित्त आयोगांतर्गत मौजा तेलकामठी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर येथे नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या बांधकामाला २ नोव्हेंबर २०२५ रोजी भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली होती. सदर बांधकामाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असतानाच संरक्षण भिंतीच्या कामावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
या आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामासाठी ६१.१९ लाख रुपयांचा निधी मंजूर असून, काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. या कामाचे कंत्राट मे. आशीष दयानंद तारु यांना देण्यात आले आहे. तसेच बांधकामासाठी २४ महिन्यांचा दोष निवारण कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
या कामाचे भूमिपूजन डॉ.आशिष देशमुख आमदार सावनेर विधानसभा,डॉ.राजीव पोतदार विधान परिषद आमदार नागपूर, भारतीय जनता पक्षाचे नागपूर ग्रामीण (काटोल)जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी सरपंच प्रेमाताई सुरेशराव डफरे, उपसरपंच उमराव भुजाडे तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, बांधकाम आता अंतिम टप्प्यात असताना आरोग्य उपकेंद्राच्या संरक्षण भिंतीबाबत गंभीर आक्षेप घेण्यात येत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,संरक्षण भिंत नवीन उभारण्याऐवजी जुन्याच भिंतीची काही प्रमाणात दुरुस्ती करून पुन्हा रंगरंगोटी व काम केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंजूर निधीतून प्रत्यक्षात कोणते काम करण्यात आले, जुन्या भिंतीचा किती वापर करण्यात आला आणि त्यासाठी किती खर्च दाखविण्यात आला, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
शासकीय निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि कामाच्या दर्जाला प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून संरक्षण भिंतीच्या कामाची तांत्रिक तपासणी करावी. मंजूर अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका आणि प्रत्यक्ष झालेल्या कामाची पडताळणी करून दोष आढळल्यास संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी तेलकामठी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
आता संबंधित बांधकाम विभाग या तक्रारीची दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करतो का आणि शासकीय निधीच्या विनियोगाबाबत वस्तुस्थिती समोर आणतो का,याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
तेलकामठी आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह! जुन्या संरक्षण भिंतीचीच दुरुस्ती करून नव्याने बांधकाम केल्याचा आरोप – चौकशी करून कारवाईची ग्रामस्थांची मागणी





