नागपूर
हा भारत देश परम वैभवाला नेण्यासाठी सुरू असणाऱ्या विविध मार्गा बरोबरच ग्राहक चळवळीचे राष्ट्र कार्य हा हि एक सन्मार्ग असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी देवगड येथील क्षेत्रिय अभ्यास वर्गाच्या समारोप प्रसंगी बोलताना केले.
श्रीक्षेत्र देवगड तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे दि. १५ व १६ फेब्रुवारी रोजी या दोन दिवशीय अखिल भारतीय ग्राहक पंचायत या देशव्यापी सुवर्ण महोत्सवी संघटनेच्या पश्चिम क्षेत्रीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. ग्राहक चळवळीच्या कार्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रेरणा ही अंतर्मुख करायला लावणारी असते. त्यामुळे निस्वार्थी भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे चारित्र्य, नीतिमत्ता आणि प्रेरणा ही शुद्ध आणि सात्विकच असायला हवी. असेही परखड मत सूर्यकांत पाठक यांनी अध्यक्षीय समारोपात बोलताना व्यक्त केले. संघटनेचे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन व दिप प्रज्वलनाने शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी अभ्यासवर्गास प्रारंभ झाला. याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांच्यासह राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे, राष्ट्रीय सहसचिव जयंतीभाई कथिरिया, क्षेत्रीय संघटनमंत्री गजानन पांडे, मध्य महाराष्ट्र प्रांताअध्यक्ष बाळासाहेब औटी, विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, देवगिरी प्रांताअध्यक्ष डॉ. विलास मोरे आदी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी शनिवार दि.१५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे यांनी घेतलेल्या कार्यकर्ता गुण व्यवहार तर राष्ट्रीय सह-सचिव जयंतीभाई कथिरिया यांनी घेतलेल्या अभ्यास वर्गा मागील आवश्यकता या दोन्ही सत्रानी अभ्यासवर्ग प्रारंभ झाला. सायंकाळच्या सत्रात राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्य विजय सागर यांनी रेरा व ग्राहक संदर्भातील इतर कायदे यांची माहिती दिली. मध्य महाराष्ट्र प्रांताअध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी संघटन वाढीसाठी उपयुक्त असणारे ग्राहक पंचायतीचे कार्यक्रम यावर आपले विचार मांडले. रात्री भोजनोत्तर सत्रा मध्ये जून २०२५ पर्यंत राष्ट्रीय कार्यकारिणी यांचे कडून देण्यात आलेल्या सामाजिक विषयांवर जागरण, माहिती अधिकार कायद्याखाली मागवावयाची माहिती, शाळा महाविद्यालयीन स्तरावर प्रबोधन, प्रांत पदाधिकारी रचनेतून होणारा प्रवास अशा चार विषयांवर उपस्थित पदाधिकारी यांच्यात प्रांतश: गट चर्चा घडवून आणली.
दुसऱ्या दिवशी रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी प्रांत पदाधिकारी गुण दोष, अपेक्षित रचना या विषयांवर राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे यांनी तर जिल्हा स्तरावरून आलेल्या पदाधिकारी यांच्या समवेत राष्ट्रीय सह सचिव जयंतीभाई कथिरिया यांनी समांतर सत्र घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय पदाधिकारी हरीश कुलकर्णी यांनी कार्यकर्ता समन्वय यावर तर दुसरे संघ क्षेत्रीय पदाधिकारी गोरक्षनाथ यांनी विमर्श या विषयावर महत्वपूर्ण उद्बोधन केले. पुढील भोजनोत्तर सत्रामध्ये विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी ग्राहक कार्यकर्ता अध्ययन तर देवगिरी प्रांत अध्यक्ष मान. विलास मोरे यांनी वृत्त कथन यावर चर्चा घडवून आणली. मध्य महाराष्ट्र प्रांत सचिव संदिप जंगम, विदर्भ प्रांत सचिव नितीन काकडे, देवगिरी प्रांत सचिव मंदार जोशी यांनी आप आपल्या प्रांताचा अहवाल सादर केला.
क्षेत्रीय संघटन मंत्री गजानन पांडे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य धनंजय गायकवाड यांनी या दोन दिवसीय अभ्यास वर्गात संघटनात्मक दृष्ट्या पार पडलेल्या विविध प्रांतशा गटवार चर्चा सत्रात सहभाग नोंदविला. या दोन दिवसीय निवासी क्षेत्रीय अभ्यासवर्ग प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी यांच्या सह मध्य महाराष्ट्र, देवगिरी, विदर्भ, कोकण प्रांतातून प्रांत व जिल्हा स्तरावरून आलेले ८५ पदाधिकारी सहभागी झाले होते.
मध्य महाराष्ट्र प्रांताअध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी स्वागत केले तर आभार प्रांत संघटन मंत्री प्रसाद बुरांडे यांनी मानले. अभ्यास वर्गाच्या यशस्वीतेसाठी मध्य महाराष्ट्र प्रांत सचिव संदीप जंगम, उपाध्यक्ष विलास लेले, कोषाध्यक्ष विनोद भरते, सह सचिव विलास जगदाळे, समन्वयक दिपक इरकल यांच्या सोबत अहिल्यानगर चे जिल्हा अध्यक्ष अतुल कुऱ्हाडे, जिल्हा संघटन मंत्री बाळासाहेब कोकाटे जिल्हा कार्यकारिणी व नेवासा तालुका पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सामूहिक पसायदानाने या क्षेत्रीय अभ्यासवर्ग चा समारोप झाला.
Home अभ्यास दौरा मध्य महाराष्ट्र प्रांत यांच्या आयोजनतून श्री क्षेत्र देवगड जिल्हा अहिल्या नगर येथे...



