यवतमाळ
वैध मापन शास्त्र विभाग आणि सर्वसामान्य ग्राहक यांचा दैनंदिन जिवनात अत्यंत निकटचा संबंध आहे त्यामुळे ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते आणि वैध मापन विभागात कार्यरत जबाबदार कर्मचार्यांनी परस्पर समन्वयाने ग्राहक जागृतीसाठी कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी येथे केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत यवतमाळ व यवतमाळ जिल्हा वैध मापन शास्त्र कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे दि.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी एकदिवसीय ग्राहक प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. वैध मापन विभागाचे नियंत्रक कुलदीपक रिठे, निरीक्षक गजानन पोहणकर यावेळी मंचावर उपस्थित होते.
डॉ मेहरे म्हणाले, मापात पाप करणार्या मंडळीवर संबधित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्या साठी या विभागाने आवाहन केले तेव्हा ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते सहकार्य करण्यास सदैव तत्पर असतात. त्यांचे सहकार्य घेण्यास कधीच मागेपुढे पाहू नका असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
श्री रिठे व श्री पोहणकर यांनीही यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना कायद्यातील तरतुदीचा उपयोग ग्राहक जागृतीसाठी कसा करावा यासंदर्भात समयोचित मार्गदर्शन केले. अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा संपूर्ण जिल्ह्यात आयोजित करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले.
प्रारंभी ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक हितेश सेठ,कुलदीपक रिठे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव डॉ केशव चेटूले,कोषाध्यक्ष अनंत भिसे, प्रांत प्रसिद्धी प्रमुख विरेंद्र चौबे, प्रसार विभागाचे संतोष डोमाळे,शहर सचिव डॉ शेखर बंड,सह सचिव जितेंद्र बंगाले,मोहन कुलकर्णी, विपुल पोबारू, प्रकाश चणेवार,यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. वैध मापन विभागाचे अक्षय राठोड, विजय सव्वालाखे,इंगळे शाम इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. अशा प्रकारची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या बद्दल वैध मापन विभागाचे अभिनंदन करण्यात येत आहे.




