सावनेर
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अँग्रिस्टॅक योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीची आणि पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदविणे बंधनकारक आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी फार्मर आयडी अत्यावश्यक आहे. सावनेर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ३० मे पूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठे यांनी केले आहे. खरीप हंगामातील कृषी योजना,बियाणे व खते अनुदान, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता, नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई, महाडीबीटी पोर्टलवरील सर्व अर्ज यासाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाइल क्रमांक, सातबारा उतारे आवश्यक असून तालुक्यातील सीएससी केंद्रावर जाऊन फार्मर आयडी शेतकऱ्यांना काढता येतो. मात्र, अजूनही काही शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित असल्याचे चिन्ह आहे.
फार्मर आयडी का आवश्यक आहे?
फार्मर आयडी हे शेतकऱ्यांच्या शेतीचे डिजिटल ओळखपत्र आहे. या मार्फत शेतकरी कोणते पीक घेत आहेत, किती क्षेत्रात शेती करतात, ते कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत याची अचूक माहिती शासनाला मिळते. शेतकऱ्यांना वेळीच मदत व अनुदान योजनेचा लाभसुद्धा मिळू शकते.



