Home अंधश्रद्धा जनजागृती वन्यजीव सप्ताहानिमित्त चित्रकला स्पर्धा व निसर्गभ्रमंती कार्यक्रम

वन्यजीव सप्ताहानिमित्त चित्रकला स्पर्धा व निसर्गभ्रमंती कार्यक्रम

76
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
वनपरीक्षेत्र कार्यालय,कळमेश्वर अंतर्गत दिनांक १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मौजा आदासा येथील निसर्ग निर्वाचन केंद्र,आदासा येथे श्री.गजानन हायस्कूल, आदासा शाळेतील ५ वी ते १० वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना वनविभागामार्फत आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. शाळेच्या प्राचार्या अनिता जी.नाईटे यांच्यासह सहशिक्षक पी.आर.हेलोंडे,एस. लोही,एस. एम. तिडके,जे. एम. मेश्राम,टी. ए. उईके व जिचकार सर यांनी या उपक्रमात विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी पी. आर. सिरपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या प्रसंगी वनपाल के. एम. जामगडे, सार्वे तसेच वनरक्षक आर. एस. हुलकाने,एम. सी. बोपटे,डी. के. पडवाल,पाटील,बदोले यांच्यासह कर्मचारी वसंता काहाते,प्रकाश उईके,कृष्णा मानमोडे,बालू नागपुरे,मंगेश पांडे व राकेश बावणे उपस्थित होते.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी निसर्ग, वन्यजीव, पर्यावरण व प्रदूषण संरक्षण या विषयांवर कल्पक व संदेशपर चित्रे साकारली. त्यानंतर विद्यार्थ्यांना निसर्गभ्रमंती घडवून आणण्यात आली. या भ्रमंतीत विविध झाडांचे सांस्कृतिक, धार्मिक, औषधी व आर्थिक महत्त्व स्पष्ट करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे महत्त्व, मानव–वन्यजीव संघर्षाची कारणे व उपाययोजना, नामशेष होण्याच्या धोक्यात असलेल्या वन्यजीवांचे संवर्धन व अवैध वृक्षतोडीचे दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग, वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन उपक्रमाचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here