नागपूर
देशातील तरुण पिढीला ऑनलाईन गेम्सच्या विळख्यातून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने संमत केलेल्या प्रमोशन अॅण्ड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग अॅक्ट 2025 या कायद्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने जोरदार समर्थन केले असून, या कायद्याच्या विरोधात दाखल झालेल्या विविध याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळाव्यात, यासाठी केंद्र शासनाने आपली बाजू न्यायालयात सशक्तपणे मांडावी, अशी ठाम मागणी ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेत करण्यात आली.
नागपूर येथील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात 17 ते 19 सप्टेंबर 2025 दरम्यान पार पडलेल्या या राष्ट्रीय परिषदेत ऑनलाईन गेम्स संदर्भातील प्रस्ताव सर्वसंमतीने संमत करण्यात आला. परिषदेत देशभरातील 38 प्रांतांतील 250 हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
2022 मध्येच केलेली होती कायद्याची मागणी
या प्रस्तावाच्या अनुषंगाने बोलताना ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. नारायणभाई शहा म्हणाले, “2022 मध्ये फरिदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय सर्वसाधारण सभेतच ऑनलाईन गेम्समुळे होणाऱ्या मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक नुकसानीची जाणीव ठेवून, आम्ही केंद्र शासनाकडे कठोर कायद्याची मागणी केली होती. सरकारने याची दखल घेऊन हा कायदा संमत केला, याबद्दल आम्ही आभारी आहोत.”पण या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करणाऱ्या काही कंपन्यांनी विविध उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित सुनावणीचे आदेश दिले आहेत.अशा वेळी तरुण पिढीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने आपली भूमिका ठामपणे मांडावी, असे आवाहन परिषदेत करण्यात आले.
GST कपात धोरणाचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचावा
परिषदेत ग्राहकहिताशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यात केंद्र सरकारने घेतलेल्या GST कपात धोरणाचा थेट लाभ सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचावा, यासाठी आवश्यक ती कायदेशीर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणारा ठरावही संमत करण्यात आला. ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सचिव जयंत कथीरिया, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अॅड. दुर्गाप्रसाद सैनी यांनी संघटनेची भूमिका सुस्पष्टपणे मांडली.
संघटनात्मक बळकटीकरणावर भर
या तीन दिवसीय परिषदेत ग्राहकहिताच्या मुद्द्यांसोबतच संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांचे सबलीकरण या विषयांवरही मंथन झाले. उद्घाटनप्रसंगी रा.स्व.संघाचे विदर्भ प्रांत सह संघचालक डॉ. श्रीधर गाडगे उपस्थित होते. समारोपप्रसंगी रा.स्व.संघाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे यांनी सदस्यसंख्या आणि सक्रीय कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्याचे आवाहन केले.
परिषदेस मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये अ.भा. ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष अशोक पांडे, सचिव जयंत कथीरिया, विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, अ.भा. संघटनमंत्री दिनकर सबनीस, केंद्रीय सदस्य विजय सागर, अरुण देशपांडे, अॅड. संदीप पंड्या, पश्चिम क्षेत्र संघटक नितीन काकडे, विदर्भ सचिव डॉ. चारुदत्त चौधरी, संघटक अभय खेडकर यांचा समावेश होता.
कार्यकर्त्यांच्या समर्पणामुळे परिषद यशस्वी
या राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी विदर्भ आयटीसेल प्रमुख चंद्रशेखर साठे, रविंद्र तायडे, विलास ठोसर, संजय साळवे, शरद जिचकार, प्रभाकर शिवणकर, तुकाराम लुटे, प्रमोद बाजोरिया, प्रविण पाटील, डॉ. शोभा गायकवाड, संतोष डोमाळे, सतीश माळवी, श्रीपाद भट्टलवार, चंद्रशेखर पांढरे, रविंद्र जिभकाटे, तृप्ती आकांत, नंदिनी चुनारकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.




