सावनेर प्रतिनिधी
सावनेर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण महिला’ वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले असून या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नगराध्यक्षपदाची स्वप्नं पाहणाऱ्या अनेक पुरुष उमेदवारांच्या आकांक्षांना मोठा धक्का बसला असून, सध्या संपूर्ण शहरात महिला उमेदवारांच्या संभाव्य नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
दिनांक ६ ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात, मुख्याधिकारी आर्शिया जुही यांच्या उपस्थितीत आरक्षण प्रक्रियेनुसार नगराध्यक्षपद ‘सर्वसाधारण महिला’साठी राखीव असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे सावनेर नगरपरिषदेवर पुन्हा एकदा ‘महिला राज’ कायम राहणार आहे.
मात्र, प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेवर सत्ताधारी नेत्यांचेच नियंत्रण राहणार, अशीही चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. याआधी ‘आमचाच नगराध्यक्ष होणार’ म्हणणारे काही पुरुष नेते आता हास्याचा विषय ठरत असून, “या राव नगराध्यक्षसाहेब!” अशी विनोदी टिप्पणी जनतेतून ऐकायला मिळते आहे.
प्रमुख पक्षांतर्फे उमेदवारांच्या शर्यतीला सुरुवात
नगराध्यक्षपद महिला राखीव झाल्यानंतर सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी जनमानसात ओळख असलेल्या, सक्षम महिला उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.
भाजपकडून चर्चेत असलेली नावे
वनिता घुगल – माजी नगरसेविका, भाजप शहराध्यक्ष भिमराव उर्फ राजू घुगल यांची पत्नी
जयश्री मोवाडे – वरिष्ठ भाजपा नेते रामराव मोवाडे यांची पत्नी
संजना मंगळे – भाजप तालुकाध्यक्ष मंदार मंगळे यांची पत्नी
सोनाली उमाटे – व्यवसायिक तुषार उर्फ बंटी उमाटे यांच्या पत्नी
डॉ. ज्योत्स्ना धोटे – वरिष्ठ चिकित्सक, डॉ. विजय धोटे यांच्या पत्नी
काँग्रेसकडून पुढे येणारी नावे
वैशाली घटे – माजी उपाध्यक्ष गोपाल घटे यांची पत्नी
शिल्पा बसवार – सामाजिक कार्यकर्ते मनोज बसवार यांच्या पत्नी
वंदना विरखरे – प्रा. साहेबराव विरखरे यांच्या पत्नी
सीमा चाफेकर – माजी नगरसेवक सुनील चाफेकर यांच्या पत्नी
इतर चर्चेत असलेल्या महिला उमेदवार
पद्मा भुते – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
किशोरी बसवार – शिवसेना (शिंदे गट)
प्रियंका पीसे – माजी नगराध्यक्ष ॲड. चंद्रकांत पीसे यांची पत्नी
ॲड. पल्लवी मुलमुले – माजी नगराध्यक्षा
नुतन बालपांडे – समाजसेवक प्रकाश बालपांडे यांची पत्नी
रेखा मोवाडे – माजी नगराध्यक्षा
ॲड. जयश्री चौधरी – सामाजिक क्षेत्रात सक्रीय
संपूर्ण सावनेरवासियांचे लक्ष अंतिम निर्णयाकडे सध्या अनेक महिला उमेदवारांची नावे चर्चेत असली तरी अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे. मात्र, या निवडणुकीत महिलांचा दबदबा निश्चित असून, सावनेर नगरपरिषदेच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मोठा बदल घडणार हे निश्चित आहे.




