(सावनेर तालुका प्रतिनिधी)
सध्याच्या राजकीय वातावरणात जिथे अनेक नेते केवळ प्रसिद्धीसाठी फोटोसेशन आणि दिखाव्यात रमलेले दिसतात, तिथे सावनेर शहराध्यक्ष राजू घुगल यांनी आपल्या साधेपणाने, प्रामाणिक कार्यशैलीने आणि जनसेवेच्या भावनेने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शहरात तसेच ग्रामीण भागातही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. त्यांची पत्नी, माजी नगर परिषद सभापती सौ. वनिता घुगल यांनीही गटनेत्या आणि जलपुरवठा व बांधकाम सभापती म्हणून शहरात अनेक महत्त्वाची कामे करून सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
साध्या परिवारातून उभा राहिलेला नेता
गुजरखेड़ी (ता. सावनेर) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले राजू घुगल बालपणापासूनच जनसेवेत सक्रिय आहेत. सकाळी सायकलवरून दूध वितरण करणारा हा तरुण पुढे ग्रामपंचायत वाघोडा येथे जनतेच्या आग्रहावरून भाजपच्या तिकीटावर निवडून आला. त्या काळी भाजप शून्य अवस्थेत असताना त्यांनी पक्षाला उभारी देऊन ग्रामपंचायतवर भगवा फडकावला.
नंतर सावनेर नगरपरिषदेत क्षेत्र समाविष्ट झाल्यानंतरही जनतेने राजू घुगल यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना नगरसेवक म्हणून प्रचंड मतांनी निवडून दिले. त्यांच्या कार्यकाळात शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणीपुरवठा, रस्त्यांची सुविधा, स्वखर्चाने केलेली कामे या सर्वांनीच त्यांची जनतेतील लोकप्रियता वाढवली.
शहराध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी
भाजपने त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना सावनेर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यांच्या अध्यक्षतेच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने उत्तम कामगिरी केली.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सहयोगी पक्ष शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार राजू पारवे यांना चांगला पाठिंबा मिळाला, तर अलीकडील विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. आशीष देशमुख यांनी सावनेर शहरात हजारोंच्या आघाडीने विजय मिळवला. या यशामागे राजू घुगल यांच्या नियोजनशक्तीचा आणि संघटनक्षमतेचा मोठा वाटा असल्याचे पक्षातील वरिष्ठांनी मान्य केले.
सदस्य नोंदणी मोहिमेत ऐतिहासिक यश
सन 2024–2025 या वर्षात भाजप सदस्य नोंदणी मोहिमेअंतर्गत 1000 नवे सदस्य नोंदवून राजू घुगल यांनी सावनेर शहराला जिल्ह्यात अव्वल स्थानावर नेले. या उल्लेखनीय यशाबद्दल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधायक डॉ. आशीष देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे आणि जिल्हा सचिव रामराव मोवाडे यांनी राजू घुगल यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन केले.
जनतेचा सेवक म्हणून उभा राहिलेला आदर्श
राजू आणि सौ. वनिता घुगल हे दाम्पत्य आजही कोणत्याही स्वार्थाशिवाय समाजकार्यात सक्रीय असून, सामान्य नागरिकांशी थेट संपर्क ठेवत जनतेच्या सेवेला स्वतःला वाहून घेत आहेत. त्यांच्या कार्यातून आजच्या तरुण पिढीला निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने राजकारणात यश मिळवता येते हा संदेश मिळत आहे.




