Home Breaking News लिंकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट थांबवा – अनैतिक विक्री पद्धतीवर अ.भा. ग्राहक पंचायत...

लिंकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट थांबवा – अनैतिक विक्री पद्धतीवर अ.भा. ग्राहक पंचायत मौदा ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

41
0

तालुका प्रतिनिधी मौदा
शेतकऱ्यांना युरिया खत खरेदी करताना जबरदस्तीने इतर महागडी रासायनिक खते, लिक्विड खते किंवा कीटकनाशके घ्यायला लावण्याच्या “लिंकिंग” या बेकायदेशीर प्रथेविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मौदा तालुक्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात अ. भा. ग्राहक पंचायतने तहसीलदार, मौदा यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना दि.४ नोव्हेंबर रोजी निवेदन दिले असून, या प्रथेमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे नमूद केले आहे.
लिंकिंग म्हणजे काय?
युरिया खत मिळवण्यासाठी विक्रेते शेतकऱ्यांना इतर खते किंवा कीटकनाशके जबरदस्तीने विकतात. “युरिया हवे असेल तर ही इतर उत्पादने घ्यावीच लागतील” असा दबाव टाकला जातो. परिणामी शेतकऱ्यांना गरज नसलेली व महागडी उत्पादने विकत घ्यावी लागतात. या बेकायदेशीर पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि नफा घटतो, असा आरोप करण्यात आला आहे. ग्राहक पंचायतने म्हटले आहे की, “खत विक्रेते आणि उत्पादक कंपन्यांच्या संगनमताने बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.”
प्रमुख मागण्या –
युरिया खत विक्रीदरम्यानची ‘लिंकिंग’ प्रथा तात्काळ बंद करावी.
युरिया खत स्वतंत्रपणे आणि मागणीनुसार उपलब्ध करून द्यावे.
गैरप्रकार करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी.
संबंधित खत कंपन्यांना दंडात्मक नोटीस देऊन नियंत्रणात आणावे.
या प्रथेने अन्नदात्यांवर अन्याय होत असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी ठाम मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मौदा तालुक्याने केली आहे.
निवेदन सादरकर्ते विदर्भ प्रांत प्रसिद्धी प्रमुख तुकाराम लुटे, तालुकाध्यक्ष दिनेश ढोबळे, सचिव अजय मते, उपाध्यक्ष दिगांबर बांगडकर, सहसचिव महेंद्र चकोले, कोषाध्यक्ष डॉ. सुनिल बोरकर, पर्यावरण आयाम प्रमुख गुलाब तुरंनकर तसेच संघटनेने कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here