गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी ते हेटी (नंदाजी) ग्रामपंचायत क्रमांक १९ अंतर्गत रस्त्यावर करण्यात येणाऱ्या सी.डी. वर्क बांधकामाबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. अनेक वर्षांपासून या कामासाठी वारंवार अर्ज करूनही प्रत्यक्ष काम न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
शेतकरी देविदास तुरणकर यांच्या पत्नी पुष्पा तुरणकर यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करताना सांगितले की, ठेकेदाराकडून आर्थिक फायदा घेतल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी कागदोपत्री हे काम पूर्ण दाखवले आहे, मात्र प्रत्यक्षात ते काम अपूर्णच आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सावनेरचे उपविभागीय अभियंता राजेश पुल्लरवार यांनी नियमबाह्य पद्धतीने हे काम पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करून इतर विभागांना दिशाभूल केली आहे.
दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी तेलकामठी येथे आयोजित ₹१ कोटी ८३ लाखांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात, पुष्पा तुरणकर यांनी हा मुद्दा थेट आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यासमोर मांडला. सर्व कागदपत्रांचा आढावा घेतल्यानंतर डॉ. देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ‘पामकोर्ट लॉन’ येथे चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान,तेलकामठीत समाजभवन बांधकामासाठी (२५-१५ अंतर्गत सन २०२५–२६) ₹४० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. हे कामदेखील राजेश पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार असून, नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे की, “३०५४ अंतर्गत झालेल्या मागील कामाप्रमाणे हे कामही ‘गोळा बाजार’ होणार का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या सर्व प्रकरणामुळे गावात तसेच प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती उघड करण्याची मागणी केली आहे.
Home Breaking News तेलकामठी सी.डी. वर्क वाद तापला – पुल्लरवार यांच्यावर आर्थिक हितसंबंधांच्या आरोपांची चर्चा




