नागपूर, दि. ६ जानेवारी २०२५
नागपूर येथील ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते तथा ग्राहक जागृतीचे योद्धे विलास ठोसर यांची महाराष्ट्र शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) म्हणून निवड केली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांतातील पदाधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या उत्कृष्ट ग्राहक जागृती कार्याची विशेष दखल घेऊन ही मानाची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठोसर हे नागपूरमध्ये सामाजिक कार्य आणि ग्राहक हक्कांसाठी अथक प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे, फसवणुकीविरोधी मोहीम राबवणे अशा विविध उपक्रमांमुळे त्यांना ही संधी मिळाली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्या सामाजिक कार्यास आणखी बळ मिळेल आणि जनसेवेचे नवे विस्तार साधता येतील, असे ठोसर यांनी सांगितले.
विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना महत्त्वपूर्ण अधिकार व कर्तव्ये बहाल करण्यात आली आहेत. यामध्ये खालील प्रमुख जबाबदाऱ्या समाविष्ट आहेत:
शासकीय कामासाठी आवश्यक ओळखपत्र व रहिवासी प्रमाणपत्र जारी करणे.
नैसर्गिक आपत्तींमध्ये पंचनामे व मदत कार्यात सहभाग घेणे.
शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार करणे व जनजागृती करणे.
प्रदूषण नियंत्रण व वाहतूक व्यवस्थापनात सहकार्य करणे.
पोलिस प्रशासनाला पंचनामे व इतर कार्यात मदत करणे.
शासनाच्या सर्वेक्षण, जनगणना व विविध अभियानात सहभाग घेणे.
ग्रामसभा, राष्ट्रिय रेशन समिती व ग्राम विकास समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून उपस्थित राहणे.
शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी प्राधान्य मिळणे.
ही नियुक्ती पूर्णतः मानसन्मानाधारित असून, यासाठी कोणतेही वेतन, मानधन किंवा भत्ते अनुज्ञेय नाहीत. तथापि, घर, दुकान किंवा कार्यालयावर “विशेष कार्यकारी अधिकारी” असा फलक लावण्याची विशेष अनुमती देण्यात आली आहे. मात्र, वाहनावर असा उल्लेख करण्यास मनाई आहे.
ठोसर यांच्या या नियुक्तीमुळे नागपूरसह विदर्भातील जनतेला
शासकीय योजनांचा अधिक चांगला लाभ मिळेल व सामाजिक कार्याला नवे बळ प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशासाठी सामाजिक क्षेत्रातील सहकाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.




