मौदा (तालुका प्रतिनिधी)
कोणत्याही संघटनेची खरी ओळख तिच्या कार्यकर्त्यांमधूनच समाजासमोर येत असते. कार्यकर्ता हा संघटनेचा आरसा असून संघटनेची प्रतिमा, विचारधारा व कार्यपद्धती समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य तो करीत असतो. त्यामुळे संघटनेची सकारात्मक प्रतिमा जोपासण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री नितीन काकडे यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायती नागपूर जिल्हा कार्यकर्ता अभ्यास वर्ग कळमेश्वर येथील ईरिस शेतकरी प्रशिक्षण सभागृहात रविवारी दि. ४ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. या अभ्यास वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे होते. नितीन काकडे पुढे म्हणाले की, शोषणमुक्त समाज निर्मितीचे ग्राहक पंचायतीचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांच्या निष्ठावंत कार्यातूनच पूर्णत्वास जाऊ शकते. त्यासाठी ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य परिश्रमपूर्वक करावे लागेल. विदर्भातील कार्यकर्ते या दृष्टीने सक्रिय भूमिका बजावत असून ही बाब निश्चितच समाधानकारक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. नारायण मेहरे यांनी ग्रामीण भागातील ग्राहकांना त्यांच्या हक्कांबाबत जागृत करण्याची गरज अधोरेखित केली. तर केंद्र प्रमुख सुनील कोंडे यांनी शेतकरी ग्राहकांच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊन त्यांचे निराकरण करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रांत संघटक अभय खेडकर व प्रांत सचिव डॉ. चारुदत्त चौधरी यांनीही मार्गदर्शनपर भाषणे केली. कार्यक्रमास मंचावर नागपूर जिल्हाध्यक्ष संजय साळवे, जिल्हा सचिव प्रभाकर शिवणकर, नागपूर महानगर अध्यक्ष शरद जिचकार, प्रांत उपाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार सहसचिव विलास ठोसर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजय साळवे यांनी, सुत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पोटे यांनी केले तर राजेंद्र धिवारे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सचिव प्रभाकर शिवणकर, प्रकाश क्षीरसागर, अनिल मेहरे, गुणवंत आत्राम, विनोद सरपे, भूपेश गुल्हाने तसेच जिल्हा व महानगरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
या अभ्यास वर्गात नागपूर जिल्ह्यासह विविध तालुक्यांतील ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिवसभर चाललेल्या या वर्गात ग्राहक संरक्षण कायदा व माहिती अधिकार कायदा या विषयावर जिल्हा ग्राहक आयोगाचे माजी सदस्य अविनाश प्रभुणे, पर्यावरण विषयावर डॉ. चारुदत्त चौधरी तसेच शेतकरी ग्राहकांच्या समस्या व उपाययोजना यावर सुनील कोंडे यांनी सखोल मार्गदर्शन केले.
अभ्यास वर्गामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात ग्राहक चळवळ अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. अशा अभ्यासपूर्ण उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा समारोपावेळी व्यक्त करण्यात आली.




