कळमेश्वर
तालुक्यातील तेलकामठी गावात विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंडळाच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान सप्ताहाची आज गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
तर गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या या ज्ञान सप्ताहानिमित्त आज सकाळी गावातून भव्य शोभायात्रा व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदंगाचा गजर आणि “जय जय रामकृष्ण हरी”च्या जयघोषाने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. महिला, युवक, बालगोपालांसह ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात या दिंडीत सहभाग घेतला.
यानंतर ह.भ.प. कु. दिव्या महाराज मापारी यांच्या काल्याच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या प्रभावी वाणीने आणि सुलभ उदाहरणांतून सादर केलेल्या कीर्तनास भाविकांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान तेलकामठी मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी आयोजक मंडळाचे कौतुक केले असून, अशा उपक्रमांमुळे गावातील सामाजिक व आध्यात्मिक एकोप्याला बळ मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
Home सांस्कृतिक व सामाजिक तेलकामठीत श्रीमद् भागवत कथा सप्ताहानिमित्त भक्तिमय शोभायात्रा व दिंडी सोहळा उत्साहात संपन्न




