भाजप–आघाडी युतीचा तब्बल २८ वर्षांचा इतिहास असताना, या वेळी स्थानिक पातळीवर समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. दीर्घकाळ सत्ता वाटून घेणाऱ्या दोन्ही गटांमध्ये मतभेद उफाळून आल्यानंतर आघाडीने आपल्या भूमिकेत ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता. सावनेर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर भाजपने एकहाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न रंगवले असले, तरी स्थानिक राजकारणातील वास्तव वेगळे चित्र दाखवत होते.
आघाडीने नगराध्यक्षपदासह काही महत्त्वाच्या प्रभागांसाठी न्याय्य मागण्या करत प्रस्ताव भाजपच्या नेतृत्वासमोर ठेवला होता. मात्र, वेळ निघून जाऊनही भाजपकडून कोणताही ठोस निर्णय न आल्याने आघाडीने ‘स्वबळावर लढण्याचा निर्णायक मार्ग’ स्वीकारला. या पावलामुळे आघाडीची संघटना, ताकद आणि स्वायत्त राजकीय इच्छाशक्ती ठळकपणे समोर आली.
याच पार्श्वभूमीवर ॲड. अरविंद लोधी यांनी सावनेर नगर विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी सुनिता अरविंद लोधी यांची उमेदवारी जाहीर करून २ डिसेंबर २०२५ रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीला दमदार सुरुवात दिली आहे. तसेच आघाडीकडून उभे केलेले नगरसेवकही निर्णायक लढतीसाठी सज्ज आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये आघाडीच्या या भूमिकेचे स्वागत होत असून, “आघाडीचा स्वबळाचा आत्मविश्वास सावनेरच्या भविष्यासाठी नवा मार्ग दाखवणारा” असे प्रतिक्रिया उमटत आहेत.
सध्या सावनेरमधील राजकीय वातावरणात आघाडीचा प्रभाव स्पष्टपणे वाढताना दिसत असून, युतीपेक्षा स्वतंत्र आणि सक्षम पर्याय म्हणून आघाडी आपली पकड अधिक मजबूत करीत आहे.




