गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर येथील ११ वर्षीय सोनाली संदीप मरसकोल्हे आदिवासी चिमुकलीचा विद्युत करंट लागून मृत्यू झाल्यास तिचा कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळणेबाबत व या प्रकरणामधे जे दोषी आहे त्यांचावर कार्यवाही बाबत मा.आयुषी सिंह अप्पर आयुक्त,आदिवासी विकास विभाग नागपूर यांना भाजपा जनजाती आघाडी नागपूर तर्फे निवेदन देण्यात आले.
मैदानात उघड्यावर सोडलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श होताच जोरदार विद्युत शॉक लागल्याने ११ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर नगरपरिषद हद्दीत येणाऱ्या तळ्याची पार हनुमान मंदिराजवळ शनिवार, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७. १५ वाजताच्या सुमारास घडली. सोनाली संदीप मरसकोल्हे (११), रा. करणे ले-आऊट, कळमेश्वर असे मृतक मुलीचे नाव आहे.
सोनाली शनिवारी सायंकाळी आपल्या भावासह मैदानात खेळत होती. न. प. प्रशासनाने मैदानात जिवंत विद्युत तार उघड्यावर सोडला होता. खेळताखेळता सोनालीचा पाय त्या तारेवर पडला. यामुळे तिला जोरदार विद्युत शॉक लागला व तिचा जागीच मृत्यू झाला.
नागरिकांच्या आरोपानुसार, नगरपरिषदेने लावलेल्या स्ट्रीट लाईटच्या खांबांवरील विद्युत वायर उघड्यावर सोडले होते. तळ्याची पार परिसरात गार्डन, व्यायाम साहित्य व मंदिर असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर असतो. तरीदेखील शासनाने विद्युत सुरक्षेकडे दुर्लक्ष करून निष्पाप मुलीचा बळी घेतल्याचा आरोप यावेळी नागरिकांकडून करण्यात येत आहे.या संदर्भात या चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा व तात्काळ चिमुलकली चा कुटुंबियांना आर्थिक मदत करावी व जे दोषी असेल त्यांच्यावर कार्यवाही करावी असे निवेदन भारतीय जनता पार्टी जनजाती आघाडी नागपूर मार्फत मा.आयुषीजी सिंह,अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांना देण्यात आले.शिष्टमंडळात शहर अध्यक्ष आकाश मडावी,महामंत्री ललित मडावी,स्वप्नील वलके,सागर इवनाते उपस्थित होते.




