गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
रामटेक लोकसभा क्षेत्र आणि सावनेर विधानसभा मतदारसंघाचा परिसर सध्या राजकीय दृष्ट्या अत्यंत सक्रिय झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका म्हणजे पक्षांसाठी फक्त नगरपरिषद किंवा नगरपंचायतपुरता खेळ नसून, पुढील जिल्हा परिषद आणि विधानसभा समीकरणांची पूर्वतयारी ठरणार आहेत.
गेल्या काही वर्षांत या भागात दोन राजकीय घराण्यांनी आपापली भूमिका स्पष्टपणे ठसवली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांनी खासदार श्यामकुमार बर्वे यांचा विजय सुनिश्चित करून आपली ‘किंगमेकर’ प्रतिमा अधिक मजबूत केली. दुसरीकडे, भाजपात डॉ. राजीव पोतदार आणि मनोहर कुंभारे यांनी सावनेरमध्ये आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या विजयात निर्णायक भूमिका निभावत संघटनशक्तीचे दर्शन घडवले.
आता या दोन्ही गटांमध्ये सूक्ष्म पण तीव्र लढत उभी राहिली आहे. ४ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या आचारसंहितेनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज १० ते १७ नोव्हेंबरदरम्यान स्वीकारले जाणार असून, मतदान २ डिसेंबरला तर मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. यावेळी व्हीव्हीपॅटचा वापर न करण्याचा निर्णय व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
या निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या वैयक्तिक प्रभावासोबतच सत्तारूढ पक्षावरच्या जनतेच्या विश्वासाचीही मोठी चाचणी होणार आहे. सावनेर आणि रामटेक भागात मतविभाजन स्पष्ट आहे— शहरी भागात भाजपाचा प्रभाव, तर ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे खोलवर असलेली आहे. मात्र, या दोन्हींपैकी कोण आपल्या गोटातील असंतोष कमी करून एकसंध लढाई उभी करतो, हे निर्णायक ठरणार आहे.
राजकीय समीकरणे पाहता डॉ. पोतदार आणि कुंभारे यांच्या संघटनात्मक कौशल्यावर भाजपाची बाजू अवलंबून आहे,तर सुनील केदार अजूनही ग्रामस्तरावर स्थिर कार्यकर्त्यांमुळे आत्मविश्वासात आहेत. तथापि, काही ठिकाणी स्थानिक पातळीवर स्वतंत्र उमेदवार किंवा लहान पक्षांचे प्रभावशाली नेते स्वतःचे गणित पुढे आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वेळी ‘तिसरा पर्याय’ म्हणून नव्या स्थानिक किंगमेकरचा उदयही वर्तवला जात आहे.
या निवडणुकीचे राजकीय परिणाम पुढील काही दिवसांनी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या समीकरणावर थेट पडणार आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षासाठी ही निवडणूक केवळ संघटनशक्तीची नव्हे तर जनमताचीही परीक्षा ठरणार आहे.




